लोणी काळभोर : पाटस ( ता. दौंड ) येथे दोघांना तलवार काठ्यांनी मारहाण करून दगडाने ठेचून निर्घृणपणे केलेल्या दुहेरी हत्याकांडातील फरारी झालेले चौघे आरोपी १२ तासातच जेरबंद केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
याप्रकरणी महेश उर्फ मन्या संजय भागवत ( वय. २२), महेश मारुती टुले ( वय २०, दोघेही रा. पाटस, तामखडा, ता. दौंड ), युवराज रामदास शिंदे ( वय १९, रा. गिरीम, मदनेवस्ती, ता.दौंड ) व गहिनीनाथ बबन माने ( वय १९, रा. गिरीम, रोघोबानगर, ता.दौंड ) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ( दि. ४ ) रात्री १० वाजता पाटस येथील तामखडा वस्तीत भानोबा मंदिरासमोर महेश उर्फ मन्या भागवत याने शिवम शितकल यास फोनवरुन आई बहिणीवरुन शिवीगाळ करून दम दिला होता. शिवम संतोष शितकल ( वय. २३ ) व गणेश रमेश माकर ( वय. २३, दोघे रा. पाटस, अंबिकानगर, ता. दौंड ) हे शिव्या का दिल्या याचा जाब विचारण्यासाठी तामखडा येथे गेले होते. त्यावेळी महेश भागवत, महेश टुले व अनोळखी साथीदारांनी शिवम शितकल व गणेश माकर या दोघांना तलवार, काठ्यांनी जबर मारहाण करुन खाली पाडून त्यांच्या डोक्यावर दगडाने घाव घालत निर्घृणपणे दोघांचा खून केला होता. या संदर्भात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वरिष्ठ पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असताना गुन्हयातील आरोपी हे बारामती विमानतळ रस्त्यावरील वनविभागाच्या जागेत लपून बसल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून चौघांना ताब्यात घेतलेले आहे. सदर आरोपींनी गुन्हयाची कबुली दिलेली असून आरोपींना पुढील कारवाईसाठी यवत पोलीसांच्या ताब्यात दिलेले आहे. पुढील अधिक तपास यवत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, दत्ता तांबे, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अभिजित एकाशिंगे, काशिनाथ राजापुरे, शब्बीर पठाण, विद्याधर निचित, प्रमोद नवले, गुरु जाधव यांनी केलेली आहे.