लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : सातारा येथून न्यायालयीन कामकाज संपवून पुण्यात येत असताना कात्रज घाटात लघुशंकेसाठी थांबल्यानंतर तीन सराईत पळून गेल्याची खोटी माहिती पोलिसांनी पुढे करून वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोरवाडी, पिंपरी न्यायालयाच्या आवारातून आरोपी पळून गेले. मात्र, ते साताऱ्याहून आणत असताना कात्रज घाटातून पळाले, अशी दिशाभूल करणारी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी उघडकीस आणले.काल्या ऊर्फ राजू महादेव पात्रे (रा. विद्यानगर, चिंचवड), संतोष मच्छिंद्र जगताप (रा. मोरवाडी, पिंपरी) आणि लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदिलकर (रा. लवळे, ता. मुळशी) हे तीन आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पिंपरीतून आरोपी पळून गेल्याचा ठपका आपल्यावर बसू नये, यासाठी पिंपरी पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी कात्रज घाटातून पळून गेल्यासंबंधीचा गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकरणाचा तपास केला असता, प्रकार वेगळाच असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी हा गुन्हा तपासासाठी पिंपरी पोलिसांकडे वर्ग केला आहे. काल्या, संतोष आणि लुभ्या यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तिघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. सातारा येथील गुन्ह्यासंदर्भात १० एप्रिलला खंडाळा (जि. सातारा) येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेथून परतताना लघुशंकेचे कारण देऊन पोलीस व्हॅन कात्रज घाटात थांबविण्यात आली होती. तेव्हा आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाल्याची खोटी तक्रार संबंधित पोलिसांनी केली होती.
पोलिसांची अशीही बनवाबनवी
By admin | Published: June 26, 2017 3:51 AM