पुणे : राज्यातील सर्वच शहरांचे तापमान वाढत चालले आहे. दुपारच्या सुमारास सूर्य आग ओकत असल्याने नागरीकही घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. त्यातच डाॅक्टरही उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध पदार्थ आहारात घेण्यासाठी सांगत आहेत. याच रणरणत्या उन्हात ट्रॅफिक पाेलीस वाहतूक नियमन करत असतात. ट्रॅफिक पाेलिसांना या कडक उन्हात थंडावा मिळावा यासाठी कुलिंग जॅकेट आणि कॅप देण्यात आले असून यामुळे भर उन्हातही वाहतूक पाेलीस आता कुल राहणार आहेत.
पुण्यातील प्राज फाऊंडेशन तर्फे शहर वाहतूक पाेलिसांना बुधवारी 500 कुलिंग जॅकेट आणि 500 कुलिंग कॅप भेट देण्यात आल्या. यावेळी पाेलीस आयुक्त डाॅ. के. वेंकटेशम, वाहतूक पाेलीस उपायुक्त पंकज देशमुख, प्राज फाऊंडेशनच्या संचालिका परिमल चाैधरी, सहायक पाेलीस आयुक्त प्रभाकर ढमाले, पाेलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, जगन्नाथ कळसकर आदी उपस्थित हाेते.
पाेलिसांना देण्यात आलेले जॅकेट बाहेरील तापमानापेक्षा पाच ते सहा अंश सेल्सिअसने तापमान कमी राखते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गारवा जाणवणार आहे. जॅकेटच्या आतल्या बाजूला स्पेर लावण्यात आला आहे. थ्री लेअर तंत्रज्ञान वापरुन हे जॅकेट तयार करण्यात आले आहे. जॅकेटच्या प्रत्येक लेअरमध्ये सेल्युलर असते. जॅकेटवरील बाहेरील बाजूने पाणी मारल्यास ते आतमधील सेल्युलर पर्यंत पाेहचते. पाणी आणि सेल्युलरच्या क्रियेतून आतील बाजूस थंडावा निर्माण हाेताे. जॅकेट हे वजनाला हलके असल्याने पाेलिसांना त्याचे ओझे जाणवणार नाही.