फुरसंगी : जर्मन शेफर्ड जातीचा अडीच वर्षांचा टायसन नावाचा पाळीव कुत्रा हरविल्याबाबतचा तक्रारी अर्ज हडपसर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. यामुळे पोलीसही अवाक् झाले आहेत. आता पोलिसांना माणसांबरोबरच हरवलेल्या पाळीव जनावरांचा शोध घ्यावा लागणार आहे, याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.याबाबत टायसनचे मालक नितीन शिंदे (रा. रिव्हर पार्क, सोनारपूल, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी तक्रार अर्ज केला आहे. शिंदे यांच्या तक्रार अर्जानुसार, या अडीच वर्षांच्या टायसन कुत्र्याला ते गेली अनेक महिने सांभाळत होते. २२ आॅक्टोंबर रोजी दुपारी एक वाजल्यापासून तो अचानक घरासमोरून बेपत्ता झाला. त्याचा कुटुंबीयांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर त्यांनी टायसन हरविल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.टायसन हा कुत्र्याला परिसरातील अनेक लोक शिंदे यांच्याकडे विकत मागत होते. मात्र, तो आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग होता व त्याचा लळा घरातील सर्वांना लागला होता. त्यामुळे आम्ही त्याला विकत नव्हतो. टायसनला विकत मागणा-यांपैकी कोणीतरी एकानं त्याला चोरले असावे, असा संशय शिंदे यांनी तक्रार अर्जात व्यक्त केला आहे. तसेच आमच्या लाडक्या टायसनला शोधून आमच्या ताब्यात द्यावा, अशी विनंती पोलिसांना त्यांनी केली आहे. या तक्रार अर्जावर सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.
पोलिसांना आता कुत्र्याचा घ्यावा लागणार शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 12:06 AM