रस्त्यावर वाहतूककोंडी होऊ नये. यासाठी अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन वाहतूक विभागाकडून तयार करण्यात येतात. यात नो पार्किंग परिसरात गाडी उभी असल्यास वाहतूक पोलीस टोईंग करतात आणि दंड वसूल करतात. मात्र, पुण्यातून आता एक अजब प्रकार समोर आला आहे. साहेब, माझी गाडी नो-पार्किंगमध्ये नाही, मी दोन मिनिटांसाठी रस्त्यालगत गाडीवरच थांबलेलो आहे, मी गाडी पार्किंग केलेलीच नाही, मी लगेचच येथून जातो, कृपया माझ्यावर कारवाई करू नका, असे सांगत असतानाही पोलिसांनी क्रेनच्या (टोइंग) साहाय्याने दुचाकीस्वारासह दुचाकी उचलली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमे-यात कैद झाली. या घटनेची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर गृहमंत्री वळसे-पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेतली. शुक्रवारी विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत वळसे-पाटील यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
---