लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे शहरात संचारबंदी लागू करावी लागली आहे. अशावेळी पोलीस पुन्हा बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पहिल्या लाटेच्या वेळी तब्बल दीड हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. आताही अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काहींनी तर लशीचे डोस घेतल्यानंतरही त्यांना लागण झाली आहे. त्यामुळे बंदोबस्त करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, अशी विनंती त्यांचे आप्त करीत आहेत.
सध्या संचारबंदी लागू असल्याने भर उन्हाळ्यात पोलीस दलाला रस्त्यावर थांबून पुन्हा एकदा बंदोबस्त करावा लागत आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये, नागरिकांनी घरात बसावे. विनाकारण फिरु नये, म्हणून पोलिसांना आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उन्हापावसात थांबावे लागत आहे.
पुणे शहर पोलीस दलात ८ हजार ६४४ पोलीस अधिकारी आणि अंमलदार असून त्यांच्यापैकी ८५ टक्क्यांहून अधिक जणांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर जवळपास ४० टक्क्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
३५९ पोलीस पॉझिटिव्ह
दुसर्या लाटेत गेल्या काही दिवसांमध्ये अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आतापर्यंत ३५९ पोलीस पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
एकूण पोलीस - ८६४४
पोलीस अधिकारी - ७४४
पोलीस अंमलदार - ७९००
पहिला डोस घेणारे - ७३२९
दुसरा डोस घेणारे - ३४१९
एकूण कोरोना बाधित पोलीस - २०५९
सध्या उपचार सुरु असलेले पोलीस अंमलदार २२२
एकूण कोरोनाबाधित पोलीस अधिकारी - २२०
सध्या उपचार सुरु असलेले पोलीस अधिकारी - २७
मृत्यू - १ अधिकारी, १२ अंमलदार
............
बाबा, आम्ही घरी वाट पाहतोय
आमचे बाबा दौंडहून दररोज पुण्याला कामाला येतात. या प्रवासात त्यांचा अनेकांशी संपर्क होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्हाला नेहमीच त्यांची काळजी वाटते. प्रवासात मास्क अजिबात खाली घ्यायचा नाही, असे आम्ही त्यांना सांगत असतो.
- रुचिता (वय १७) व रत्नेश विजय कदम (वय १५)
मी स्वत: डॉक्टर असल्याने वडिलांना सतत काय काळजी घ्यावी, हे सांगत असते. कोणाशीही बोलताना ६ फुट लांब राहून बोला. मास्क काढू नका, दर अर्ध्या तासाने हात धुवत राहा आणि नाकाला हात लावू नका, असे त्यांना वारंवार सांगत असते.
- डॉ. साक्षी विनायक पाठक
......
माझ्या बाबांना काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे त्यांना मी नेहमी बाहेर जास्त फिरु नका असे सांगते. घरी आल्यावर अंघोळ केल्याशिवाय जवळ येऊ नका असे म्हणते. ते घरात आल्यानंतर मी स्वत: बाजूला थांबते.
- गार्गी गणेश झगडे (वय साडेचार वर्षे)