धायरी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन असतानादेखील सायंकाळी ' वॉक'ला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागल्यामुळे, नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवर सिंहगड रस्ता पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वडगांव बुद्रुक येथील कॅनॉल शेजारील ट्रॅकवर सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पोलिसांनी सर्व बाजूंनी घेरा घालून तब्बल १०९ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत ५४ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस आणि महापालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांना वारंवार केले जात आहे. मात्र काहीजण तरीही या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत सायंकाळी वॉकला घराबाहेर पडतात. अशा व्यक्त्तींविरोधात सिंहगड रस्ता पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तसेच यापुढील काळात संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही, अशी सक्त ताकीदही दिली.
सध्या पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी होत आहे. मात्र अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. मात्र सायंकाळी फिरायला जाणाऱ्या पुणेकरांच्या डोक्यात ही बाब शिरत नसल्याचं दिसतंय. त्यामुळेच सिंहगड रस्ता पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्याविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राइक' करून दंड वसूल केला. यावेळी पुरुषांशिवाय अनेक महिलाही फिरताना आढळून आल्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर, नितीन जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली.
.......यापुढे अशी चूक करणार नाहीपोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला असताना काही नागरिकांनी स्वतः पुढे येऊन यापुढे अशी चूक करणार नसल्याचे जाहीरपणे सांगितले. वडगांव बुद्रुक, माणिकबाग, सनसिटी, गोयल गंगा आदी परिसरातील नागरिक याठिकाणी सायंकाळी फिरण्यास आले होते.
.......काही व्यक्ती विनाकारण फिरताना आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा कोणी विनाकारण घराबाहेर फिरत असेल तर त्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे. - देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षकसिंहगड रस्ता पोलीस ठाणे