राजगुरुनगर: शहरात अनेक शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच अंतर्गत रस्ते अरुंद, त्यातच वाहनांचे होणारे पार्किंग यांमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांतून वारंवार होत होती. अखेर पार्किंग समस्येवर पोलीस प्रशासन आणि राजगुरुनगर परिषदेने तयार केलेल्या धोरणाला प्रांताधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.
पुणे-नाशिक महामार्ग शहरातून जात असल्याने व महामार्गाच्या दोन्ही बाजूला दुचाकी,चारचाकी वाहने वाटेल त्या पद्धतीने उभी केली जात आहे, त्यामुळे वारंवार वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते.वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रणात आणणे जिकिरीचे होत आहे. वाहनांच्या रांगा लागत असून पर्यायाने इंधन व वेळेचे नुकसान होत आहे. शहरात शासकीय कार्यालय असल्याने तालुक्यातून येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पार्किंग अस्ताव्यस्तपणे करण्यात आले आणि वाहतूककोंडीत भर पडते. यावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांकडून वारंवार आवाज उठवण्यात आला होता. त्यानुसार पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाने सयुक्तरीत्या शहरातील पार्किंग धोरण निश्चित करून त्यासंदर्भातील मंजुरीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवले होते. त्या प्रस्तावाला आता मंजूर मिळाली आहे.
या धोरणानुसार वाडारोडवर आवश्यकतेनुसार काही भाग पार्किंगसाठी व काही भाग नो-पार्किंगसाठी निश्चित करण्यात येणार आहे. तसेच खेड सत्र न्यायालयामागील रस्त्यावर चांडोली येथील नवीन पुलामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे,तसेच न्यायालय,तहसील कार्यालय व इतर महत्वाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे तो रस्ता नो-पार्किंग झोन असणार आहे.वाहतूक समस्या निवारणार्थ नो-पार्किंग व पार्किंगचे बोर्ड प्रत्यक्ष स्थळी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होणार नाही, परंतु नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व इतर कायदेशीर कारवाई करावी लागेल जेणेकरून वाहतूककोंडी टाळणे सुलभ होईल असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.
हरकती नोंदवण्याचे आवाहन
शहरातील वाहतूककोंडी समस्या सोडवण्यासाठी पार्किंग धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणासंदर्भात विविध संघटना,नागरिक यांची मते ही जाणून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोणाला काही आक्षेप असल्यास त्यासंदर्भात नागरिकांनी नगरपरिषदेमध्ये जाऊन हरकती नोंदव्यात असेही असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.