पुणे : भर रस्त्यात महिलेला मारहाण करीत त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून लैंगिक अत्याचाराची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या कोंढवा येथील राजकीय कार्यकर्त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत हा आदेश दिला. सतपाल रामचंद्र पारगे (वय ४६, रा. कुबेरा पार्क सोसायटी, कोंढवा खुर्द) असे त्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
याबाबत, ३२ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रात्री नऊच्या सुमारास वानवडी परिसरात ही घटना घडली. फिर्यादी या त्यांच्या ११ वर्षीय मुलीसह मोमोज खाण्यासाठी येथील संविधान चौकात आल्या होत्या. यावेळी, आरोपीने त्यांच्या दुचाकीला गाडी लावत फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनतर, त्याठिकाणी असलेल्या त्यांच्या मुलीचा विनयभंग करत लैंगिक अत्याचाराची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात, सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले. तर, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. यशपाल पुरोहित व ॲड. प्रिया पायगुडे यांनी काम पाहिले.
याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास ॲड. देशमुख यांसह फिर्यादीच्या वकिलांनी विरोध केला. पारगे याने केलेला गुन्हा बाललैंगिक अत्याचाराशी संबंधित असून तो गंभीर स्वरूपाचा आहे. तो सामाजिक कार्यकर्ता तसेच राजकीय पक्षाशी संबंधित असून त्यामार्फत फिर्यादी तसेच पीडितेवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी ॲड. देशमुख यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ती मान्य केली.