PDCC च्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलचं पेटणार; अजितदादा नेमकी कोणाला संधी देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:01 PM2021-09-28T22:01:23+5:302021-09-28T22:03:11+5:30
मंत्री, आमदारांना सुटेना जिल्हा बँकेचा मोह; जिल्हा बँकेचे कारभारी होण्यासाठी जोरदार फिल्डींग
पुणे: पुणे जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांना महत्त्वाचे मंत्री पद असताना देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा मोह सुटत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याचे राजकारण आणि ग्रामीण भागातील मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी हक्काचे व्यासपीठ हाताशी हवेच यासाठी मंत्री, आमदारांनी पडद्याआडून व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. तर काही सदस्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामुळेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच पेटणार आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच केंद्रबिंदू ठरली आहे. यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेवरील आपले वर्चस्व गेले अनेक वर्षे टिकून ठेवले आहे. यामुळेच राज्यात अनेक महत्त्वाचे मंत्रीपद भूषवली तरी बँकेचे संचालकपद कायम ठेवले.
पवारानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणेहे देखील बँकेवर संचालक आहेत. याचबरोबर खेडचे आमदार दिलीप मोहिते, पुरंदर आमदार संजय जगताप, भोरचे आमदार संग्राम थोपटे, आमदार अनिल भोसले हे आमदार बँकेवर संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. याचबरोबर या निवडणुकीमध्ये आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांनी देखील संचालक म्हणून निवडून जाण्याचा चंग बांधला आहे. अजित पवार यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या बँकेवर संचालक म्हणून निवडून देण्यासाठी अजित पवारांचे निकटवर्तीय असणे अतिशय महत्त्वाचे असते. तरच बँकेवर जाता येते.
जिल्हा बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. या बँकेचे कारभारीपद मिळण्यासाठी सर्वच धडपड सुरू असते. परंतु गेले अनेक वर्षे बहुतेकांच्या नशिबी वनवास आला आहे. यामुळेच यंदा होणा-या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक देव पाण्यात ठेवून बसले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीसाठी सध्या अनेक नावांची चर्चा होत असली तरी अजित पवार नेमकी कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.