प्रचाराच्या ताेफा झाल्या शांत ; प्रचाराचे साहित्य ठेवले झाकून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 03:34 PM2019-04-22T15:34:28+5:302019-04-22T15:38:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची केंद्रबिंदू असलेली पुण्यातील दाेन्ही महत्त्वाच्या पक्षांची कार्यालये साेमवारी शांत दिसत हाेती.
पुणे : गेल्या महिनाभरापासून पुणे आणि बारामती मतदारसंघामध्ये सुरु असलेला प्रचार अखेर काल संध्याकाळी 6 वाजता संपला. निवडणुकीच्या 48 तास आधी प्रचार संपवने कायद्याने बंधनकारक असल्याने काल संध्याकाळी प्रचाराच्या ताेफा शांत झाल्या. पुण्यात भाजपा युतीकडून गिरीश बापट निवडणुक लढवीत आहेत. तर काॅंग्रेसकडून माेहन जाेशी रिंगणात आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची केंद्रबिंदू असलेली पुण्यातील दाेन्ही महत्त्वाच्या पक्षांची कार्यालये साेमवारी शांत दिसत हाेती. आपल्या पक्षाला मत द्यावे असा प्रचार करणारे फ्लेक्स, हाेर्डिंग्स झाकून ठेवलेले पाहायला मिळाले.
पुणे लाेकसभेच्या जागेसाठी उद्या मतदान हाेत आहे. या निवडणुकीत काेण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान महिनाभर शहरभर चाललेला प्रचार आता बंद झाला आहे. काल संध्याकाळी 6 नंतर प्रचार बंद झाला. त्यानंतर प्रचाराचे साहित्य तसेच वाहने झाकून ठेवण्यात आली. महिनाभर शहरात प्रचारासाठी एलईडी गाड्या फिरत हाेत्या. तसेच रिक्षा इतर माेटारींच्या माध्यमातून देखील प्रचार करण्यात येत हाेता. या सर्व गाड्यांवरील प्रचार साहित्य झाकून ठेवण्यात आले आहे. भाजपाचे जंगली महाराज रस्त्यावरील प्रचार कार्यालयाला लावण्यात आलेले फ्लेक्स, हाेर्डिंग्ज झाकून ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान उद्या सकाळी 7 वाजल्यापासून पुण्यातल्या मतदानाला सुरुवात हाेणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चाेख बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबराेबर पाेलिस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. शहरातील सर्व मद्य दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहेत.