महाराष्ट्रात राजकीय भूंकप; उद्धव ठाकरे पुण्यातील जिगरबाजांचे कौतुक करण्यात मग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 04:30 PM2023-07-02T16:30:39+5:302023-07-02T16:31:26+5:30
अजित पवार आणि आमदार शपथ घेत असताना उद्धव ठाकरे यांच्या ऑफिशीयल ट्विटर हॅण्डलवरून तरुणांच्या कौतुकाचे ट्विट शेअर
पुणे : अजित पवार यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांचा पक्षच फोडला आहे. आज अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आलेले ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यात एवढा मोठा राजकीय भूकंप होत असताना उद्धव ठाकरे पुण्यातील जिगरबाजांचे कौतुक करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. उद्धव ठाकरेंच्या ट्विटर हँडलवरून पुण्यातील धाडसी तरुणांचे कौतुक केले असून फोटोही शेअर केले आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये घडलेल्या थरारक घटनेत, माथेफिरूच्या हल्ल्यातून एका तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या धाडसी तरुणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची आज मातोश्रीवर भेट घेतली. उद्धवसाहेबांनी या तरुणांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असल्याचे त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून सांगण्यात आले आहे. एका बाजूला अजित पवार आणि आमदार शपथ घेत असताना उद्धव ठाकरे यांच्या ऑफिशीयल ट्विटर हॅण्डलवरून तरुणांच्या कौतुकाचे ट्विट शेअर झाले आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये घडलेल्या थरारक घटनेत, माथेफिरूच्या हल्ल्यातून एका तरुणीचा जीव वाचवणाऱ्या @LJavalge आणि हर्षद पाटील या धाडसी तरुणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची आज मातोश्रीवर भेट घेतली. उद्धवसाहेबांनी या तरुणांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करून त्यांच्या… pic.twitter.com/2WJJBrTAkD
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 2, 2023
राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे दिली आहेत.