पुणे : कदाचित अजित पवारही राज ठाकरे यांच्या प्रमाणे स्वतःचा वेगळा पक्ष काढू शकतात असे मत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले होते. परंतु अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व कोडी उलगडली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काकडे यांना चांगलेच खडसावले आहे. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तर काकडे यांना तुमच्या भविष्यवाणीचे दुकान बंद करा अशा शब्दांमध्ये सुनावले आहे.
30 वर्ष राजकारणात असलेला माणूस झटदिशी बाजूला होईल असे वाटत नाही. अजित पवार यांची धडाडी बघता ते वेगळा निर्णय घेऊ शकतात असा तर्क काकडे यांनी शनिवारी सकाळी माध्यमांसमोर बोलून दाखवला. राज ठाकरेही मनसेची स्थापना करण्यापूर्वी 7 दिवस नॉट रीचेबल होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. महाराष्ट्रात त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवारांना अजित पवार दूर जाणे परवडणारे नाही. त्यांचा स्वभाव मला माहिती आहे असेही त्यांनी म्हटल होतं.
त्यानंतर काहीच तासांमध्ये अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. त्यामुळे काकडे यांचा तर्क चुकला असून चाकणकर यांनी ट्विटरवरून त्यांचा समाचार घेतला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, ' संजय काकडे तुमच्या भविष्यवाणीचं दुकान आता बंद करा. खरं तर तुम्हा लोकांना, इतका मोठा परिवार एकत्र आहे आणि तो एकविचाराने रहातो याचेच जास्त दुःख आहे. पुण्यातील पुरपरिस्थतीत दिसले नाही कोठे??तिकडे पण बघा जरा असा टोलाही त्यांनी लगावला. आता या ट्विटला काकडे यांनी उत्तर दिले तर शहरात नवा राजकीय वाद बघायला मिळू शकतो.