पुणे : छत्रपती संभाजी महाराज पुलावरील (लकडी पूल) मेट्रो पुलाच्या कामावरून मंगळवारी (दि. २१) महापालिकेत गोंधळ घातला गेला. विशेष म्हणजे मेट्रोसंदर्भातले अभियांत्रिकी ज्ञान नसणारे गोंधळ घालण्यात आघाडीवर होते. प्रत्यक्षात एकाही प्रतिष्ठित, तसेच मानाच्या गणपती मंडळांनी मेट्रोला विरोध न करण्याची सुबुद्धी दाखविलेली असताना त्यांचे नाव पुढे करून पुणेकरांच्या मेट्रोत विघ्ने आणण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे राजकीय पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने लकडी पुलावरील मेट्रो मार्गिकेसंदर्भातला तांत्रिक अहवाल यापूर्वीच सादर केला आहे. त्याची माहिती संबंधित नगरसेवकांना आहे. तरीदेखील अज्ञात गणेश मंडळांची नावे पुढे करीत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मेट्रो पुलाला विरोध करीत गोंधळ घालण्यात आला. विरोधकांचा गोंधळ न थांबल्याने सत्ताधाऱ्यांनी सभेचे कामकाज गुरुवारपर्यंत (दि. २३) तहकूब केले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस बंदोबस्तात २१ डिसेंबरच्या रात्रीपासून काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत,’ असे सांगितले. मात्र, हे खोटे असल्याचे सांगत अजित पवारांनी असे आदेश पुलाबाबत दिले नसल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ म्हणाल्या.
विकासाच्या कामात विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहन महापौरांनी केले. त्यावर गणेश मंडळांवर अन्याय होत असल्याचे सांगत काँग्रेसचे आबा बागूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप, शिवसेनेेचे पृथ्वीराज सुतार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांच्यासह अन्य विरोधकांनी मेट्रो पुलाला विरोध सुरू ठेवला.
एकाही गणेश मंडळाचा नाही विरोध
''आजपर्यंत जेव्हा-जेव्हा छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रो पुलाबाबत आंदोलन झाले तेव्हा शहरातील एकाही गणेश मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिलेले नाहीत. गणेशोत्सव बचाव कृती समितीने गणेश मंडळांच्या पाठिंब्यासंदर्भात केलेला दावा खोटा दावा असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले आहेत.''
विरोध कशासाठी?
लकडी पुलावरून जाणाऱ्या मेट्रो पुलामुळे वर्षातून एकदा निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा होईल हा आक्षेपाचा मुद्दा आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी किंवा मार्ग बदलावा अशी मागणी केली जात आहे.
...तर भुर्दंड पुणेकरांना
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या पक्षाच्या नगरसेवकांचे ऐकले तर सध्या सुरू असलेल्या मेट्रो पुलाचे ३९ पिलर पाडून नव्याने बांधावे लागतील. त्यासाठी ७० कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाचा भुर्दंड पुणेकरांना सहन करावा लागेल. शिवाय या कामासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागेल ज्यामुळे पुणेकरांचे मेट्रोत बसण्याचे स्वप्न आणखी दूर जाईल. आणखी एका पर्यायानुसार १७ पिलर पाडून नव्याने बांधावे लागतील. त्यामुळे पुणेकरांना २३ कोटी रुपयांचा भुर्दंड बसून मेट्रोला दीड वर्षे उशीर होऊ शकतो.
अजित पवारांच्या सूचनेला केराची टोपली?
१३ डिसेंबर २०२१ रोजी उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस संरक्षणात काम सुरू करण्याचे आदेश दिले व याविषयी पोलीस आयुक्तांसोबत १४ आणि १५ डिसेंबर रोजी भेट घेऊन चर्चा झाली. त्यामध्ये पोलीस आयुक्तांनी २१ डिसेंबर रोजी काम पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या, असे पत्र महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ यांनी महापौरांना दिले होते. या पत्रातील उल्लेखाप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार मंगळवारी (दि. २१) काम सुरू करून बुधवारी (दि. २२) पहाटेपर्यंत ते पूर्ण केले जाणार होते. तसे असेल तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी राज्याच्या सत्तेत त्यांचे नेते असणाऱ्या अजित पवारांच्या सूचनेला महापालिकेत केराची टोपली दाखविली.