इंदापूर : इंदापूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले मजबुत स्थान असणारे इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नगरसेवक, इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी घरगुती कारण सांगत गुरुवारी ( दि. २९ ) रोजी त्यांच्याकडील विविध पदांचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने इंदापूरच्या राजकीय क्षेत्रात भूकंप झाला आहे.
भरत शहा यांच्या राजीनाम्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीला तसेच सहकार क्षेत्र व त्यांच्या हजारो समर्थकांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
भरत शहा हे हर्षवर्धन पाटलांचे एक विश्वासू व निकटवर्ती मानले जातात. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या कडून भरत शहा यांच्या राजीनाम्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते मी माझ्या घरगुती अडचणीमुळे थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजीनामा दिला आहे. नवीन माणसांना सर्व क्षेत्रात संधी मिळावी असे मला वाटते अशी प्रतिक्रिया भरत शहा यांनी दिला.
माजी खासदार दिवंगत कर्मयोगी शंकरराव पाटील यांचे अत्यंत निकटचे सहकारी व त्यांच्या राजकीय सामाजिक कारकीर्दीचे साक्षीदार कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, उपाध्यक्ष गोकुळदास ( भाई ) शहा यांचे भरत शहा हे पुतणे आहेत. सलग पंधरा वर्षे ते इंदापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.
भरत शहा हे गेल्या दहा वर्षांपासून कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते कार्यरत आहेत. सन २०१२ २०१७ या कालावधीत ते इंदापूर उपनगराध्यक्ष होते. सन २०१७ पासून आजतागायत ते नगरसेवक म्हणून काम पहात आहेत. इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांचे ते दीर तसेच इंदापूर तालूका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांचे ते बंधू आहेत.
शंकरराव बाजीराव पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू असणारे गोकुळदास शहा यांचे पाटील कौटुंबासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणाच्या जडण घडणेमध्ये शहा कुटुंबाचा मोठा वाटा आहे. इंदापूर नगरपरिषद यापंचवार्षिक मध्ये खेचून आणण्यात भरत शहा यांचा मोलाचा वाटा आहे. नगराध्यक्षपदी अंकिता मुकुंद शहा ह्या निवडूण आल्यामुळे इंदापूर नगरपरिषदेवर हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराची सत्ता तिसऱ्यांदा कायम राहिली.
सध्या भरत शहा व मुकुंद शहा तसेच नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या विचाराने चाललेल्या इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून आजतागायत झाले नसलेली, कोट्यवधी रुपयांचे विकासकामे झाले आहेत. त्यामुळे इंदापूर शहरातील नागरिकांमध्ये शहा कुटुंबाची वेगळीच भावना निर्माण झाली आहे.
आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम ताकद असतानाही गेली साडेचार वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला एकही आंदोलन करता आले नाही. इंदापूर नगरपालिकेचे निम्म्याहून अधिक नगरसेवक असताना राष्ट्रवादीला शांत करण्याचा करिश्मा शहा बंधूंनी केला होता. __________
शहा परिवाराचा त्याग झाला मातीमोल.....
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करताना इंदापूर शहरातील शहा परिवाराचे प्रचंड मोठे योगदान आहे. नुसते योगदान नाही तर स्वतःच्या कष्टाने कमावलेली जमीन, गरीबांच्या झोपडीतील मुलांच्या शिक्षणासाठी शहा परिवाराने दान दिली आहे. परंतू, या संस्थेतील अधिकार जाणून बुजवून हिरावून घेतल्यामुळे, चक्क राजकारणाच्या वाटा बंद करून राजीनामे देत शहा यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. तर शिक्षण क्षेत्रातील योगदान या परिवाराचे मातीमोल झाली आहे,अशी चर्चा तालुकाभर रंगली आहे. _________