भरत शहा हे हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय; इंदापूर तालुक्यात राजकीय भूकंपाची चर्चा
बाभुळगाव : इंदापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणुक अवघ्या काही दिवसावर येवुन ठेपली असतानाच राज्याचे माजी सहकारमंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत विश्वासू व निष्ठावान कार्यकर्ते तथा इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा यांनी काही दिवसापुर्वी घरगुती कारण सांगत आपल्या सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शहा यांच्या राजीनाम्यामुळे इंदापूर तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून भविष्यात शहा कुटुंबिय कोणती निर्णायक भूमिका घेणार याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
भरत शहा यांनी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमनपदासह, कर्मयोगी सह.साखर कारखाना संचालक, व नगरपरिषदेचे नगरसेवक पदाचाही राजीनामा दिला आहे.त्यामुळे तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. शहा यांचे राजीनाम्याचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी ते नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. भविष्यात कोणता निर्णय घेणार याबाबत ते मौन बाळगून आहेत. परंतु,राजकीय गोटात आतुन हालचालींना वेग आल्याच्या चर्चेने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
भरत शहा यांनी निर्णयाबाबत मौन बाळगले असले तरी भविष्य काळात ते मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर शहा यांचे मोठे बंधु मुकुंद शहा हे हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पदाची जबाबदारी अनेक वर्षापासून सांभाळत आहेत.तर मुकुंद यांच्या पत्नी अंकिता शहा या इंदापूर नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ते काही दिवसांपासून संस्थेतील अंतर्गत कामकाजाबाबत नाराज असल्याची चर्चा तालुक्यात गेल्या वर्षभरापासुन दबक्या आवाजात सुरू आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित होत असलेल्या तालुका प्रशासकीय आढावा बैठकीला मागील सहा ते आठ महिन्यापासून नगराध्यक्षा अंकिता शहा व मुकुंद शहा यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. शहा परिवाराची भरणे यांच्याशी जवळीक ही तालुक्याच्या राजकारणातील नवीन समीकरणांची नांदी असल्याचे बोलले जात आहे.
इंदापूर तालुक्यात शहा परिवाराचा चांगला जनसंपर्क असुन ते हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत विश्वासु म्हणुन ओळखले जातात. भविष्यात शहा कुटुंबियांचा वेगळा राजकीय निर्णय हर्षवर्धन पाटील गटाला राजकीय दृृृृष्ट्या परवडणारा नसल्याने तालुक्यातील राजकीय घडामोडीकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.———————
इंदापूर तालुक्यात दत्तात्रय भरणे विरूद्ध हर्षवर्धन पाटील यांच्यातील शह काटशहाचे राजकारण चांगलेच रंगत आहे. २०१९ च्या विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे इंदापूर कृृषि उत्पन्न बाजार समीतीचे तत्कालीन सभापती अप्पासाहेब जगदाळे, छत्रपतीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, व जेष्ठ नेते अशोक घोगरे यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये घेत मोठा राजकीय भूकंप घडवण्याच्या हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांना मोठा धक्का देण्याची राजकीय खेळी केल्याने २०१९ ची विधानसभा चांगलीच गाजली होती.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक व अत्यंत विश्वासु म्हणून ओळखले जाणारे कर्मयोगीचे संचालक तथा इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष व नगरसेवक भरत शहा,त्यांच्या वहिनी व विद्यमान नगराध्यक्षा अंकिता शहा आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांना राष्ट्रवादीमध्ये घेवुन हर्षवर्धन पाटील यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला तालुक्यात उधाण आले आहे.तर इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा दत्तात्रय भरणे विरूद्ध हर्षवर्धन पाटील यांचेतील राजकीय संघर्ष पाहायला मिळणार असल्याने तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.