शिक्रापूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकीय समीकरणांनी वेग घेतला असून, आंबेगावला जोडलेला केंदूर-पाबळ जिल्हा परिषद गट, कान्हूर मेसाई, रांजणगाव व टाकळी हाजी गटात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस, भाजपा, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, पक्षांतर्गत बंडाळी रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींची कसरत या तिन्ही गटांत पाहावयास मिळत आहे. मागील निवडणुकीत या तिन्ही गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. तर, पंचायत समितीत केंदूर पंचायत समिती भाजपाने ताब्यात घेतली होती. राजकीय डावपेचांत सध्या शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी या तिन्ही गटांत आपल्या पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी कंबर कसली आहे. या प्रमुख पक्षांबरोबरच भाजपाचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांनी भाजपाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, जिल्हा स्तरावरून काँग्रेसने या तिन्ही गटांत आपले उमेदवार उतरवण्याची जय्यत तयारी केली आहे. या भागात मनसेचे वर्चस्व कमी असले, तरी उमेदवार उभे करण्यासाठी पक्षपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पंजा, घड्याळ, कमळ, धनुष्यबाण, रेल्वे इंजिन तर काही अपक्ष चिन्हांवर उमेदवारी मिळवून निवडणूक लढवताना ऐन वेळी राजकीय कोलांटउड्या या गटांत दिसण्याची शक्यता आहे. पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीबरोबरच गट व गणातील कार्यकर्त्यांना जवळ घेऊन दबावतंत्राचा वापर करून कुठल्याही परिस्थितीत पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा कस लागणार असून, भाजपा-सेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती झाली नाही, तर या तिन्ही गटांत अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. (वार्ताहर)ग्रामीण भागात वाढली हायटेक प्रचार यंत्रणागेल्या १५ वर्षांत जि.प., पंचायत समिती निवडणूक प्रचारात आमूलाग्र बदल झाला असून, भोंगागाडी, पत्रके याचबरोबर भिंतीवरील जाहिरातींनी बदल केला असून, सोशल मीडियावर इच्छुकांनी भर देत व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून व वृत्तपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मोबाईल मेसेज व व्हॉईस रेकॉर्ड मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
केंदूर-पाबळ गटात राजकीय समीकरणांना वेग
By admin | Published: January 22, 2017 4:36 AM