राजू इनामदार
पुणे: एकीकडे भर दुपारी झालेल्या सभेला उपस्थिती लावलेले श्री सेवक उष्माघातात बळी गेले; तर दुसरीकडे अजित पवार भाजपसाेबत जाणार या चर्चेने राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी ‘सत्तेवर असणारे काय आणि सत्तेवर नसणारे काय? ही लोकं काहीही करतील. सगळेच एका माळेचे मणी!’ अशा शब्दांत आपला उद्वेग व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी सोडणार आणि भाजपात प्रवेश करणार, या चर्चेने राजकारण ढवळून निघत आहे. यामागे समाजमाध्यमांचा अगदी व्यवस्थित वापर करून घेणाऱ्यांचा मास्टरमाईंडच कार्यरत असल्याचा संशयही अनेकांनी व्यक्त केला. वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्तेही या चर्चेने दिङमूढ झाले असल्याचे दिसते आहे.
अजित पवारांवर तरी विश्वास कसा ठेवायचा?
खुद्द अजित पवार यांनीच असे काहीही नाही, असे सांगितल्यानंतरही लोक त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. एका नागरिकाने सांगितले की, त्यांच्यावर तरी विश्वास कसा व का ठेवायचा. ते एकदा पहाटे गेले नव्हते का शपथ घ्यायला? त्यावेळी गेले होते तर आता जाणारच नाहीत हे कशावरून? दस्तुरखुद्द अजित पवारच घडामाेडी नाकारत असतानाही नागरिकांच्या प्रतिक्रिया अशा येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबतही बरेच काही बोलले जात आहे. त्यांनीच हे सांगितले असेल, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. यावरून राजकीय वातावरण किती तापले असेल त्याची कल्पना येते.
काहींची संहिताही लिहून तयार
बहुतेकांनी या पक्षप्रवेशाची संहिता देखील स्वत:च तयार केली आहे. ती बरोबर शिवसेना फुटली गेली त्यावर आधारित आहे. अजित पवार कितीजण घेऊन बाहेर पडतील हेही त्यात निश्चित आहे. कधी पडतील तेही सांगितले जात आहे. सत्ता स्पर्धेचा निकाल लागला की लगेचच हा प्रवेश होणार, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आणखी १६ जण अपात्र ठरणार, अशा अनेक वावड्या सध्या उडवल्या जात आहेत. अजित पवार तिकडे जातील ते मुख्यमंत्री होण्यासाठीच, अशी खात्रीही अनेकजण बोलून दाखवतात.
सामान्यांना आला उबग
दुकानदार, व्यापारी, रस्त्यावरचे विक्रेते अशा अनेकांनी या अशा राजकारणाचा उद्वेग, जाऊ द्या हो, त्यांचे काही सांगू नका आणि विचारूही नका अशा शब्दात व्यक्त केला. फोडाफोडी करणे म्हणजेच राजकारण, असे आता झाले आहे. भाजप यापुढे देशातच नाही तर जगातही याच एका वैशिष्ट्यासाठी ओळखला जाईल, असेही मत काहींनी व्यक्त केले. सत्ता मिळवणे, सत्तेत राहणे, सत्ता टिकवणे यासाठी काहीही करणे म्हणजे राजकारण अशी नवी व्याख्या आता रुढ झाली आहे. त्याला सध्याचे फोडाफोडीचे राजकारणच कारणीभूत आहे, अशी टीका केली जात आहे.
राजकीय गोटातही गडबड
- राजकीय पक्षाचे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्तेही या चर्चेने स्तंभित झाले आहेत. राष्ट्रवादीच्याच एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, राजकारणाचे असे भरीत होण्याचे कारण भाजपच आहे. शिवसेना फोडण्यामागे तेच होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी करण्यामागेही त्यांचाच हात आहे. प्रादेशिक पक्ष टिकू द्यायचेच नाहीत, असे त्यांचे धोरण आहे व त्याला अनुसरूनच त्यांचे काम सुरू आहे.- काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा सन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच भाजपने केली. याकडे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने लक्ष वेधले. प्रादेशिक पक्ष संपले की देशात तळागाळापर्यंत पोहोचलेला काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे. त्यांच्या नेत्यावर सतत आघात करत राहिले की आपोआपच त्यांची शक्ती कमी होईल. नंतर देशात राजकीय पक्षच राहणार नाहीत, अशा उद्देशाने भाजप काम करत असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले.- भाजपच्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला असता त्यांनी भाजपचा कधीही अशा गोष्टींवर विश्वास नव्हता आणि नाही असे सांगितले. राजकीय संस्कृतीच बदलत चालली आहे. कोणाला सत्तेबरोबर यावेसे वाटले तर लोकशाही राज्यव्यवस्थेत त्यांना नकार कशासाठी व का द्यायचा असा प्रश्न त्यांनी केला.