पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार अचानक राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेत नेतेही उपस्थित आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांसोबत पुण्याचेही आमदार राजभवनात गेले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, खेडचे दिलीप मोहिते पाटील, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे अतुल बेनके, इंदापूरचे दत्ता भरणे अजित पवारांसोबत राजभवनात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात राज्यपाल हे राजभवनात दाखल होणार आहेत. महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शकयता आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभावनात दाखल झाले आहेत, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप आणि शिंदे गटाचे नेतेही राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत. याशिवाय, भाजप आणि राष्ट्रवादीचे काही नेते आधीपासूनच राजभवनात दाखल झाले आहेत. आज अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे इतर काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादीचे ९ आमदार आता शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. राजभवनात शिंदे गट आणि भाजपचे नेतेही राजभवनात पोहोचले आहेत.