राजानंद मोरे पुणे : सोलापुर जिल्ह्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ व संलग्न विद्यालयांमागे राजकीय हितसंबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून करण्यात येत असलेल्या तपासणीमध्ये ही बाब पुढे आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ या नावाने विद्यापीठ आहे. कृषी परिषदेने हे विद्यापीठ व संलग्न विद्यालये अनधिकृत असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय मागासवर्ग कृषी विद्यालये, माहिती व तंत्रज्ञान विद्यालय या नावाने सुमारे ६२ विद्यालये सुरू केल्याची माहिती परिषदेकडे आहे. यामध्ये सर्वाधिक विद्यालये सोलापूर जिल्हयात २३ आहेत. तसेच पुणे, ठाणे, कोल्हापुर, सांगली, जळगाव, धुळे, लातूर, बीड, बुलढाणा, सांगली, ठाणे, अकोला, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही ही विद्यालये सुरू आहेत. याबाबतची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागातील कृषी सेवक भरती प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराने या विद्यापीठाची पदविका घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. याबाबत साशंकता निर्माण झाल्याने सहसंचालकांनी कृषी परिषदेकडे प्रस्ताव पाठवून या विद्यापीठाबाबत माहिती मागविली आहे. त्याआधारे परिषदेने मार्च महिन्यात या विद्यापीठास संलग्न विद्यालयांची माहिती घेण्याचे आदेश चारही कृषी विद्यापीठांच्या अधिष्ठांता दिले होते. त्यानुसार केलेल्या तपासणीत यातील बहुतेक विद्यालये एका खोलीत सुरू असल्याचे समोर आले आहे. परिषदेतील एक अधिकारी अनधिकृत विद्यापीठाशी संलग्न विद्यालयामध्ये पालक बनून गेले होते. तिथे प्रवेशासाठी चौकशी केल्यानंतर पाच हजार रुपयांत प्रवेश मिळतो, असे सांगण्यात आले. तसेच दोन महिन्यांपासून हे विद्यालय बंद असल्याची माहिती मिळाली.तर काही विद्यालयांच्या परिसरात काहीच नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. राहूरी विद्यापीठातील एक टीम आता प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन पाहणी करत आहे. विद्यापीठाचीही केवळ कमानच असल्याचे सुत्रांनी सांगितले..................कृषी परिषद तसेच कृषी विद्यापीठांतील अधिकाºयांनी अनधिकृत विद्यालयांशी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधल्यानंतर राजकीय हितसंबंध असल्याचे सांगण्यात आले. आपण केवळ इथे समन्वयक म्हणून काम करत असून विद्यापीठ चालविणे वेगळे असल्याचे संबंधितांनी सांगितले. बहुतेक ठिकाणी राजकीय व्यक्तींचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप नाव समोर आलेले नाही.
गुन्हा दाखल करणारचारही कृषी विद्यापीठांतील अधिष्ठांतांच्या पथकाने विद्यालयांच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. पण प्रत्यक्षात तिथे काहीही आढळून आलेले नाही. राहूरीचे पथक विद्यापीठात गेले आहे. त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.- डॉ. हरिहर कौसडीकर, संचालक (शिक्षण)महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद