पुणे : पुण्यातील काही दिशादर्शकांवर मानानियांचे फ्लेक्स लावले असल्याने दिशादर्शक नेमके कशासाठी आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दिशादर्शकांवर फ्लेक्स लागले असल्याने ठिकाण कळण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. वाढदिवस असो की एखादा जाहीर कार्यक्रम. शहरातील विविध चौकात तसेच सिग्नल्सवर मानानियांचे फ्लेक्स लावले जातात. गेल्या काही वर्षांमध्ये छोट्यामोठ्या कार्यक्रमाचे फ्लेक्स लावण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. काहीजण तर थेट दिशादर्शकांवर फ्लेक्स लावतात. असाच एक फ्लेक्स वाकडेवाडी येथील दिशादर्शकावर लावण्यात आला आहे. या फ्लेक्समुळे पिंपरीवरून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना पुण्यातील ठिकाणांच्या दिशा कळण्यास अडचण येत आहे. असाच एक फ्लेक्स एसएनडीटी चौकात लावण्यात आला आहे. कोथरूडकडून डेक्कनच्या दिशेने येताना वरील दिशा दर्शकावर फ्लेक्स लावण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रहादारींच्या रस्त्यावर सारखेच चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान महापालिकेकडून यावर कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत बोलताना संतोष भांगरे म्हणाले, मी पिंपरीवरून पुण्याकडे येत असताना वाकडेवाडी येथील दिशादर्शकावर फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यामुळे ठिकाणांच्या दिशा कळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे यावर महापालिकेने कारवाई करायला हवी. राहुल शर्मा म्हणाले, मला पुण्यात येऊन 2 महिने झाले आहेत. मला पुण्यातील अनेक ठिकाणांबाबत माहिती नाही. दिशादर्शकांवर फ्लेक्स लावण्यात येत असल्याने ठिकाणं कळण्यास अडचणी येत आहेत.