पुणे : राज्यात धुळवडीचा आनंद जल्लोषात साजरा केला जात आहे. शहरातील लॉन्समध्ये अभिनेते, कलाकारांना बोलावून मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोसायट्यांमधून लहान मुले, कुटुंब रंग खेळण्यात दंग झाल्याचे दिसून आले आहे. तर ऐन निवडणुकीच्या मुहूर्तावर एक दिवस प्रचाराला आराम देऊन राजकीय नेत्यांनी धुळवडीचा आनंद लुटला आहे. पुण्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजप नेत्या मेधा कुलकर्णी आणि रुपाली चाकणकर हे एकत्रित रंग खेळताना दिसून आले आहेत.
पुण्यात रास्ता पेठेतील टिळक आयुर्वेद महाविद्यालय मैदान येथे भोई प्रतिष्ठान च्या वतीने विशेष मुलांसाठी रंग बरसे हा रंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यंदा या उपक्रमाचे 28 वे वर्षे असून यंदा या उपक्रमात सुमारे हजारो विशेष मुले रंग महोत्सवाचा आनंद लुटताना दिसून आली. यामध्ये अनाथ, एचआयव्ही पॉझिटिव्ह, मतिमंद ,अपंग अंध ,मुले रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारी मुले ,बुधवार पेठेतील देवदासी भगिनींची मुले ,रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ करणारी मुले अशी विशेष मुले कार्यक्रमात सहभागी झाली होती. तसेच पोलीस, प्रशासन ,चित्रपट, साहित्य, कला ,संस्कृती , पत्रकारिता, राजकारण ,समाजकारण या विविध क्षेत्रातील लोकांनी मुलांसोबत रंग खेळण्याचा आनंद लुटला.
यावेळी राजकारण बाजूला ठेवूया आणि आजचा दिवस होळीच्या रंगात न्हाऊन जाऊया असं मत पुण्यातील ३ बड्या नेत्यांनी व्यक्त केलंय. इतर दिवशी एकमेकांवर राजकीय टीका टिपणी करणाऱ्या विविध पक्षातील नेत्यांनी आज एकत्र येत एकमेकांना रंग लावला. या वेळी या तिघांनी एकमेकांना रंग लावून राजकारण आजच्या दिवशी विसरायचं आणि सणाचा आनंद लुटायचा आहे अशी प्रतिक्रिया दिली.
भोई प्रतिष्ठान सामाजिक काम करणारी संस्था आहे. त्यांनी मुलांच्या आनंदासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे धंगेकर यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीबाबत धंगेकर यांना विचारले असता ते म्हणाले, पुणेकरांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. आणि त्यांचा उमेदवार समोर आहे. आमच्या मागे वस्ताद आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढणार अन् जिंकणारही असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.