पुणे : टेकड्या या पुण्याचे फुप्फुसे आहेत. त्यांच्यावर घाला घातला जात असेल, तर आम्ही निश्चितच विरोध करू. ज्या कारणासाठी टेकडी फोडली जाणार आहे, त्याचा उद्देशच साध्य होणार नसेल, तर अडीचशे कोटींचा खर्च कशाला करायचा? हा प्रश्न आहे. यामध्ये नक्कीच भ्रष्टाचाराचा वास येत आहे. त्या विरोधात उभे राहू आणि वेताळ टेकडी बचावासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन काँग्रेस, राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष, मनसे व भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी दिले आहे.
पौड रस्ता ते बालभारती या प्रस्तावित रस्त्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रस्तावित रस्त्यामुळे वेताळ टेकडीचे नुकसान होणार आहे. प्रकल्पासाठी २५६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही टेकडी वाचावी म्हणून निसर्गप्रेमी एकत्र आले आहेत.
वेताळ टेकडी बचाव मोहिमेअंतर्गत टेकडीप्रेमींकडून सर्वपक्षीय नेत्यांना भेटून या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. त्यामध्ये नक्की काय होणार आहे? लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित केला असला, तरी रस्ता झाल्यास काहीच फायदा होणार नाही. तरीदेखील महापालिका हा प्रकल्प रेटत आहे, असा आरोप टेकडीप्रेमींनी केला आहे.
सर्वपक्षीय नेत्यांना भेटलो !
या बचाव मोहिमेच्या सुमिता काळे म्हणाल्या, सगळ्याच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आम्ही भेटून आम्ही आपली बाजू समजावून सांगत आहोत. गेल्या काही आठवड्यांमध्ये, काहींच्या मदतीने, आम्ही विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि त्यापैकी काहींनी आम्हाला भेटायला बोलवले होते. आतापर्यंत अनिल शिदोरे (मनसे), मेधा कुलकर्णी (भाजप), दीपक मानकर (राष्ट्रवादी काँग्रेस), दत्ता बहिरट, मोहन जोशी, अरविंद शिंदे, रमेश बागवे आणि अभय छाजेड (काँग्रेस) यांच्याशी संवाद साधला. त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे.
निषेध मोर्चा
पुणे महापालिका वेताळ टेकडीवर तीन प्रकल्पांचे नियोजन करत आहे. त्यामुळे टेकडीचे नुकसान होणार आहे. याच्या निषेधार्थ १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता वेताळ बाबा चौक, सेनापती बापट रस्ता ते जर्मन बेकरीदरम्यान निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी फुटणारच नसेल, तर प्रकल्प कशाला राबवीत आहे. एवढे कोटी रुपये कशाला खर्च केले जात आहेत. या प्रकल्पात भ्रष्टाचाराचा वास येतोय. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करू आणि १५ एप्रिलच्या मोर्चामध्ये सहभागी होऊ.
- अरविंद शिंदे, काँग्रेस
वेताळ टेकडी फोडणे हा विकास नाही, तर विनाश आहे. एवढं तुमच्या सरकारला व आयुक्त विक्रम कुमार यांना तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सांगावं अशी विनंती आहे. दादा, पुण्यात चाललेला विक्रम-वेताळ हा खेळ तत्काळ थांबवावा... अन्यथा हे वेताळ टेकडी नावाचं भूत भारतीय जनता पक्षाच्या डोक्यावर कधी बसेल हे कळणारदेखील नाही.
- डॉ. अभिजित मोरे, आम आदमी पार्टी