पुणे : शहरातील बहुचर्चित बालभारती ते पौड फाटा रस्त्यावरून महापालिका प्रशासन, राजकीय पक्ष आणि पर्यावरणप्रेमी आमने सामने आले आहेत. या रस्त्याच्या कामाला कोणतीही स्थगिती नसून प्रशासनाकडून या कामाच्या निविदांसाठी अटी आणि शर्थी तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम संपण्यास दोन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याने त्यानंतरच निविदा काढली जाणार आहे.
सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बालभारती पौड फाटा रस्ता प्रस्तावित केला आहे. मात्र, या रस्त्यामुळे या टेकडीवरील जैवविविधता नष्ट होणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी त्यास विरोध केला आहे. त्यावरून आंदोलनेही होत असून, याप्रकरणी नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत आपली भूमिका मांडली. तर पाटील यांनीही सर्वांना विश्वासात घेऊनच काम केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, महापालिका प्रशासनाकडून या रस्त्याचे कोणतेही काम थांबविलेले नसल्याचे पथ विभागाने स्पष्ट केल्याने या प्रकरणातील वाद वाढला आहे.
''बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामाला कोणतीही स्थगिती नसून, प्रशासनाकडून या कामाच्या निविदांसाठी अटी आणि शर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम संपण्यास दोन आठवड्यांचा कालावधी लागणार असून, त्यानंतरच निविदा काढली जाणार आहे. - व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख, पुणे महापालिका.''