पुणे: राजकीय पक्ष म्हणजे टोळ्या व त्यांचे पदाधिकारी म्हणजे टोळ्यांचे नायक अशी कडक टीका करत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. ग्राहक चळवळ व सरपंच परिषद यांनी संघटनेला पाठिंबा दिला आहे असे सांगत पाटील यांनी ७ उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली.
ग्राहक चळवळ व सरपंच परिषद या संघटना आमच्याबरोबर आहेत, अन्य समविचारी संघटनांही बरोबर येत आहेत असे पाटील यांनी सांगितले. ग्राहक चळवळीचे शिवाजी खेडकर, सरपंच परिषदेचे दत्ता काकडे, अजितराव काळे, पांडुरंग रायते त्यांच्यासमवेत होते. खेडकर यांनी ग्राहक चळवळ शेतकरी संघटनेच्या बरोबरीने विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
पाटील म्हणाले, सध्याची राज्याची राजकीय स्थिती अतिशय दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर एकही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी यांना काहीही देणेघेणे नाही. फुकट पैसे वाटणाऱ्या योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्या जात आहेत, शेतकरी कुटुंबे मात्र कर्जाच्या ओझ्याखाली जगत आहेत. शेतकरी संघटना ही स्थिती पाहूच शकत नाही. त्यामुळेच सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेत निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
संघटनेने जाहीर केलेली ७ उमेदवारांची पहिली यादीयाप्रमाणे
अकोट- लक्ष्मीकांत कौठेकर, पाथरी- मोहन मानोल, इंदापूर- ॲड.पांडुरंग रायते, कराड उत्तर- वसीम इनामदार, करवीर-ॲड. माणिक शिंदे, हातकणंगले- डॉ. प्रगती चव्हाण, पलुस कडेगाव-परशूराम माळी