पुणे : राष्ट्रीय किसान महासंघाचे देशव्यापी शेतकरी संप पूर्णपणे अराजकीय आहे. शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी शेतकरी संपाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन महासंघाने केले आहे. तसेच शासनाने शेतकरी प्रश्नावर तातडीने मार्ग न काढल्यास खळखट्याकचा मार्ग स्वीकाराला लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. महासंघाच्या राष्ट्रीय कोअर कमिचीचे सदस्य संदीप गिड्डे-पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन संपाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. यावेळी कृती समितीचे सल्लागार श्रीकांत मराळ, लक्ष्मण वंगे व राज्य समन्वयक शंकर दरेकर उपस्थित होते. गिड्डे-पाटील म्हणाले, देशभरातील १३० शेतकरी संघटना संपामध्ये सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ व उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दि. ६ जून रोजी मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आयोजित केलेल्या सभेशी महासंघाचा संबंध नाही़. काही राजकीय पक्ष संपाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनी आधी संपाबाबत भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून त्यांचे शेतकरी प्रेम किती बेगडी आहे, हे दिसून येईल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातून दुध येते. हे दुध बंद झाल्यास राज्यातील दुधाला चांगला भाव मिळेल. परप्रांतियांविरोधात गळा काढणाऱ्या नेत्यांनी या प्रश्नावरही बोलावे, अशी टीका गिड्डे-पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. शेतकरी संपाबाबत शासनाची भूमिका असंवेदनशील दिसत आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने संप सुरू असल्याने शासनाने शेतकऱ्यांना गृहित धरू नये. पुणे, नाशिक, मुंबई या शहरांमध्ये दुध व भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण करण्यास संपामुळे यश आले आहे. पुढील काळात त्याची तीव्रता अधिक वाढविली जाईल. या प्रश्नावर तातडीने तोडगा न काढल्याने शेतकरी रस्त्यावर उतरतील. येत्या ६ जून रोजी देशभरात सरकारचा निषेध करण्यासाठी श्रध्दांजली सभा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर दि. १० जून रोजी भारत आंदोलनाची तयारी सुरू असून शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे गिड्डे-पाटील यांनी सांगितले.----------व्यासपीठ मिळत नसल्याने विरोधकाही शेतकरी संघटनांनी मागील वर्षीच्या आंदोलनात त्यांची विश्वासार्हता घालविली आहे. सध्या सुरू असलेल्या संपामध्ये त्यांना नेतृत्वाची संधी, व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे गैरसमज पसरविले जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यामुळे ते या आंदोलनाला विरोध करत असल्याची टीका महासंघाच्या वतीने राजु शेट्टी, रघुनाथ पाटील व अनिल घनवट यांच्यावर करण्यात आली. त्यांनी विरोध केला तरी शेतकरी त्यांचा निषेध करून संपात सहभागी होत असल्याचे गिड्डे-पाटील यांनी स्पष्ट केले.
शेतकरी संपाबाबत राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी : राष्ट्रीय किसान महासंघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:35 PM
काही राजकीय पक्ष देशव्यापी शेतकरी संपाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी संपाबाबत भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून त्यांचे शेतकरी प्रेम किती बेगडी आहे, हे दिसून येईल.
ठळक मुद्दे देशभरातील १३० शेतकरी संघटना संपामध्ये सहभागी परप्रांतियांविरोधात गळा काढणाऱ्या नेत्यांनी या प्रश्नावरही बोलावेशासनाने शेतकरी प्रश्नावर तातडीने मार्ग न काढल्यास खळखट्याकचा मार्ग