पुणे : पुणे महापालिकेचा निवडणुकांना आता एक वर्षापेक्षा ही कमी कालावधी राहिला आहे. मात्र, यंदा दोन राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागणार आहेत ते आपल्या नव्या आणि मोठ्या ऑफिसेसमधून. राष्ट्रवादी आणि मनसेची ही नवी मोठी कार्यालये सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहेत.
गेल्या निवडणुकांच्यावेळी भाजपने आपलं बुधवार पेठेतील ऑफिस सोडून सगळा बाडबिस्तर जंगली महाराज रस्त्यावरील सन्मान हॉटेल मध्ये हलवला होता. सन्मानमधल्या तळमजल्यावर भाजपचं पक्ष कार्यालय तेव्हापासून आत्तापर्यंत सुरू आहे.
आता इतर राजकीय पक्षांनी देखील आपली कार्यालये मोठ्या जागेत स्थलांतरित केली आहेत.पुण्यातील महत्त्वाचा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष कार्यालय होतं ते टिळक रस्त्यावरच्या एका छोट्या बंगल्यात. त्यातच शरद पवार, सुप्रिया सुळे असे पक्षातले महत्वाचे नेते मार्केटयार्ड मधल्या निसर्ग कार्यालयातून आपलं कामकाज चालवत असल्याने तेच पक्षाचं केंद्र झालं होतं. शहरातील मुख्य कार्यालयात महत्वाचे कार्यक्रम वगळता इतर वेळी कोणा नेत्यांची फारशी हजेरी नसायची.पण आता मात्र राष्ट्रवादी महापालिकेच्या जवळच एका मोठ्या कार्यालयात शिफ्ट होत आहे. ६००० स्क्वेअर फूटच्या या नव्या कार्यालयाचे शनिवारी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
"जुन्या कार्यालयातील जागा कमी पडत असल्याने आता मोठ्या आणि मध्यवर्ती ठिकाणी हे नवे कार्यालय उभारले आहे" असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आपले नारायण पेठेतील वाड्यातले ऑफिस सोडून नव्या ऑफिसमध्ये स्थलांतर करत आहे. नवी पेठेत मनसेचे हे नवे कार्यालय असणार आहे. मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरून नवीन कार्यालयात सुरू असलेल्या कामाचे फोटो शेअर केले आहेत.
निवडणुकांच्या पूर्वी नव्या ठिकाणी ही ऑफिस तर जात आहेत. आता निवडणुकीत बाजी कोण मारणार ते मात्र पाहावं लागेल.