पुणे: लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू झाली असून कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने वेगवेगळ्या जाती-जमाती, भिन्न धर्मीय किंवा भिन्न भाषिक यांच्यात मतभेद वाढतील किंवा जातीय वैमनस्य निर्माण होईल, अशा प्रकारच्या कृत्यामध्ये भाग घेवू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी दिले. तसेच सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे,असे आवाहन केले.लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राजकीय पक्षांची बैठकीत नवल किशोर राम बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी राम यांनी सी-व्हीजील या अॅपबाबतही विस्तृत माहिती दिली. निवडणुकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील त्रूटी दूर करण्यासाठी या सी-व्हिजिलअॅपची निर्मिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे.सी-व्हिजिल हे अॅप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणा-या नागरिकांसाठी एक अस्त्र ठरणार आहे. सर्व नागरिक या अॅपचा वापर करु शकतात. स्वतंत्र व निःपक्षपातीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व नागरिक सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात, असेही राम यांनी नमूद केले. संदीप पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी काळजी घ्यावी.त्याचप्रमाणे राजकीय मेळावे, जाहीर सभा याबाबतीत आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात.दरम्यान ,जिल्हाधिकारी राम यांनी आचार संहितेच्या काळात काय करावे आणि काय करु नये, याबाबत विस्तृत सादरीकरण केले.तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचप्रमाणे अजित रेळेकर यांनी निवडणूक खर्च व्यवस्थापन या विषयावर, सुहास मापारी यांनी एक खिडकी योजनेबाबत तर टपाली मतपत्रिकेबाबत सुनील गाढे यांनी सादरीकरण केले.
राजकीय पक्षांनी आचार संहितेचे उल्लंघन करु नये : नवल किशोर राम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 8:34 PM
कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी काळजी घ्यावी.त्याचप्रमाणे राजकीय मेळावे, जाहीर सभा याबाबतीत आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात.
ठळक मुद्देआचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी सी-व्हिजिलअॅपची निर्मिती