लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले असताना रिंगरोडच्या नावाखाली थेरगाव आणि वाल्हेकरवाडी परिसरातच बांधकामांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकीय दबावातून कारवाई सुरू आहे, असा आरोप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. प्र्राधिकरणाच्या माध्यमातून थेरगाव व वाल्हेकरवाडी परिसरातील बांधकामांवर कारवाई करणार असल्याने प्राधिकरणाचे मुख्याधिकारी सतीशकुमार खडके यांनी काही जाहीर केले होते. त्यानुसार काही बांधकामांना नोटिसाही दिल्या आहेत. प्राधिकरणग्रस्त नागरिकांच्या घरचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन या सरकारने देऊनही प्रश्न सुटलेला नाही़ खासदार बारणे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची भेट घेऊन या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देणार आहे. प्राधिकरणाचा विकास आराखडा कालबाह्य झाला असून गेल्या २२ वर्षात रिंगरोडच्या जागेचा ताबा घेतलेला नाही. महापालिकेने रस्ता, लाईट, ड्रेनेज पाणी या सारख्या सुविधा दिल्या असून या बाधीत घरांची नोंद करसंकलन विभागात आहे. मिळकतकरही वसूल करीत आहे, असे असताना २२ वर्षांनंतर रिंगरोड करण्याचे प्राधिकरणास आता कसे काय सूचले. राजकीय दबावापोटी कार्यवाही करण्यास भाग पाडले आहे. गरीब नागरिकांना उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र काही राजकीय लोक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन करीत आहेत. याचा विरोध थेरगाव, वाल्हेकरवाडीतील नागरिक करीत आहेत. त्यांच्या बाजूने आम्ही ठाम उभे आहोत. वाल्हेकरवाडी ते थेरगाव, काळेवाडी फाटा या रिंगरोड लगत जाणारा वाल्हेकरवाडी चिंचवड पूल ते बिर्ला हॉस्पिटल, मोरया मंगल कार्यालय थेरगाव गावठाण ते काळेवाडी फाटा हा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याने रिंगरोड च्या नावाखाली गरीब नागरिकांना उद्ध्वस्त करू नये. प्राधिकरणाचे अधिकारी केवळ चिंचवड विधानसभा परिसरातील थेरगाव, काळेवाडी आणि चिंचवड परिसरातच कारवाई करीत आहेत. हे न समजण्याइतपत जनता खुळी नाही.दरम्यान रिंगरोड होऊ नये तसेच सर्वसामान्यांच्या घरावर बुलडोजर फिरवू नये यासाठी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. गेले अनेक दिवस आंदोलन सुरू आहे. परंतु याबाबत प्रशासनाकडून अथवा राज्यशासनाकडून कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक याबाबत संभ्रम अवस्थेत आहेत. येथील नागरिकांना अनधिकृत बांधकामा पाठोपाठ रिंगरोड बाधित होण्याची भीती वाटू लागल्याने हवालदिल आहेत. रिंग रोडचे निमित्त : वाल्हेकरवाडीत घबराटरिंगरोडच्या नावाखाली पुन्हा एकदा थेरगाव वाल्हेकरवाडी भागातील घरांवर कारवाई होणार म्हणून नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरविली असून काही दिवसांपासून नागरिक संघटित होऊन रस्त्यावर येत आहेत. खासदार बारणे यांनीही या नागरिकांना एकत्र करण्यासाठी काही दिवसांपूर्वी एक सभा थेरगाव येथे घेतली होती सर्वाधिक नागरिकांनी एकत्र येऊन या कारवाईच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे आव्हान केले होते.
राजकीय दबावापोटी कारवाईचा बडगा
By admin | Published: July 07, 2017 3:31 AM