पुणे : मुख्यमंत्र्यांचा अवमान झाला म्हणून शिवसैनिकांनी भाजपाच्या कार्यालयात कोंबड्या सोडल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या दारात मांजर सोडले. याच्या जोडीला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी असंसदीय घोषणांची राळ ऊडवत आंदोलने करत दिवसभर धुळवड खेळली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांचा अवमान केला त्याचे असे पडसाद शहरात उमटले. शिवसैनिकांनी सकाळीच भाजपाच्या जंगली महाराज रस्त्यावरील सन्मान कार्यालयात कोंबड्या सोडल्या. राणे यांची हीच पात्रता असल्याची टीका करण्यात आली. स्वतः मुख्यमंत्री राहिलेल्या राणे यांना या पदाचे मानमर्यादा ठाऊक नाही,भाजपाने फेकलेल्या सत्तेच्या तुकड्याने त्याचे भान गेले आहे असे सांगण्यात आले. शहरात थोड्याच वेळात या कोंबड्यांची गोष्ट पसरली.
त्यानंतर लगेचच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या डैक्कन जिमखान्यावरील कार्यालयात मांजर सोडली. काँग्रेसच्या दावणीला बांधून घेऊन शिवसेनेच्या वाघाचे मांजर झाले आहे, त्यांना हीच भेट योग्य आहे अशी टीका यावेळी करण्यात आली. मांजर सोडणारे कार्यकर्ते लगेचच तिथून गायब झाले.
शिवसेनेच्या वतीने गुडलक चौक व शहरात काही ठिकाणी राणे यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्या विरोधात असंसदीय घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेचे नवेजूने सर्व कार्यकर्ते, आजीमाजी नगरसेवक तसेच शहरप्रमुख संजय मोरे यात सहभागी होते. राणेंबरोबरच भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या निषेधाच्या घोषणांही देण्यात येत होत्या.भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेत्रुत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी झाशीची राणी चौकात आंदोलन केले. ऊद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशिष्ट शब्दात घोषणा देण्यात आल्या. सोनिया गांधी,शरद पवार, आदित्य ठाकरे यांनाही घोषणांचे लक्ष्य करण्यात आले. भाजपाच्या महिला नगरसेवकही आंदोलनात सहभागी होत्या.