पुणे : आषाढी वारी पालखी साेहळ्याला दरवर्षी पायघड्या घालणारे राजकारणी यंदा गेले कुठे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या राजकारण्यांच्या मुखी पंढरपूरच्या विठ्ठलापेक्षा राजकारणातील एकनाथ असल्याचे निदर्शनास येत आहे. काेराेना संकटानंतर निघालेला यंदाचा भव्य पालखी प्रक्षेपण कुठेही दिसले नाही. याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांना सध्याच्या राजकीय भवितव्याची आणि आपले पुढे काय होणार याचीच चिंता अधिक आहे. राजकीय घडामोडींपुढे पालखी सोहळ्याचा पडलेला विसर खेदजनक असल्याची भावना विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या वारकरीवर्गातून व्यक्त होत आहे. दरवर्षी संतांचा पालखी साेहळा मंदिरातून बाहेर पडताे ना पडताे तोच विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी, कार्यकर्ते जागोजागी हजर होतात. यंदा हे चित्र क्वचितच पाहण्यास मिळाले.
पायी पालखी सोहळा दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. याचा आनंद वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहत होता, पण हा उत्साह, चैतन्य, सोहळा वृत्तवाहिन्यांवर दिसलाच नाही. काेरोना आपत्तीनंतर पक्षबदल, फोडाफोडीचे राजकारण, आरोप-प्रत्यारोप, ईडीची कारवाई यातून कुठे वेगळा व चैतन्यमय सोहळा सुरू झाला न झाला तोच राज्यातील सत्ता समीकरणांच्या गर्तेत अडकली. त्यामुळे यंदाची वारी पंढरीच्या विठ्ठलापेक्षा राजकारणातील एकनाथाच्या चर्चेतच पुणे शहरातून मार्गस्थ झाल्याचे काही ज्येष्ठ वारकऱ्यांनी बोलून दाखविले.
''दोन वर्षांनी पालखी आली; पण एकही नेता आला नाही. मतदान झाले की झाले, राजकीय घडामोडी व त्यांचाच गोंधळ सुरू आहे. नक्की काय चालले आहे याची माहिती नाही. यावरून कोणाला वारीचे काही पडले नाही हेच दिसून येत आहे असे वारकरी बाळासाहेब मोगल यांनी सांगितले.''