बारामती: बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही. बारामतीचे नाव घेतले की प्रसिद्धी मिळते. बारामतीत आल्यानंतर वेगळे बोलायचे मराठवाड्यात गेल्यानंतर बारामती वर बोलायचे, हा प्रकार योग्य नाही. अशा प्रकारचा टोला माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी (दि. १७) धाराशिव येथे पांगदरवाडी येथील प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी बारामतीने मराठवाड्याचे पाणी आडवले होते. असा आरोप केला होता. तो आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फेटाळला. परंतु रविवारी (दि. १८) आमदार शशिकांत शिंदे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भेटण्यासाठी बारामतीत आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ते म्हणाले की, कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा एकट्या आमदार, खासदार यांना नसतो तो संपूर्ण राज्याला असतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला असतो. कोणतीही गोष्ट ठरताना ती फक्त एका एका आमदार खासदारापूर्ती ठरत नाही तर ती संपूर्ण राज्य आणि केंद्र किंवा देशा समोर ठेवून तो निर्णय घेतलेला असतो. आणि अशा वेळी कोणावर ही वैयक्तिक टीका करणं हे बरोबर नाही राजकारणाचा अलीकडचा स्तर घसरलेला आहे अलीकडच्या काळामध्ये कोणताही मंत्री हा कोणत्याही एका भागाचा नसतो कोणताही नेता हा एका भागाचा नसतो तो संपूर्ण राज्य किंवा देशाचा असतो. परंतु अलीकडच्या भागांमध्ये अशा प्रकारचे राजकारण पाहायला मिळत आहे. बारामतीचे नाव घेतले की प्रसिद्धी मिळते म्हणून बारामती ने पाणी पळवले, बारामतीने अमुक केले असा अपप्रचार विरोधक करतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. वास्तविक पाहता आम्ही मंत्रिमंडळात असताना मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. कुठेही पाणी कुणाचेही अडवलेले नाही, असे शिंदे म्हणाले.