पुणे: शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी यांच्यात राजकारण रंगले आहे. पुणे व कोल्हापूरच्या दोन दादांमधील ही चुरस एकमेकांना राजकीय मात देण्यासाठी सुरू असल्याची चर्चा आहे. भाजपाच्या मुळ ३२३ रस्त्यांच्या रुंदीकरण प्रस्तावात बहुसंख्य रस्ते शिवाजीनगर व कोथरूड परिसरातील आहेत. त्यातून चंद्रकांत पाटील यांचे बस्तान पुण्यात बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सत्तेच्या साह्याने हा प्रस्ताव रद्दबातल करण्याच्या प्रयत्नात आहे.भाजपाचे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरून अशा मोठ्या प्रस्तावासाठीचे नियम डावलून हा प्रस्ताव थेट स्थायी समितीत आणून तिथे मंजूर करून घेतल्याचे बोलले जात आहे. तो प्रत्यक्षात येण्यासाठी पुढे आणखी बरेच सोपस्कार असले तरीही असेच होत राहिले तर त्यातून पुणे शहरात चंद्रकांत पाटील यांचे राजकीय वर्चस्व निर्माण होण्याच्या शक्यतेतूनच राष्ट्रवादी काँग्रेसने सावध होत याविषयावर काँग्रेस, शिवसेना, मनसे यांना बरोबर घेत नियम, कायदा, संकेत याची आघाडी उघडत प्रस्तावाला जोरदार विरोध सुरू केला आहे.भाजपाच्या मुळ रुंदीकरण प्रस्तावात शहरातील ३२३ रस्त्यांचा उल्लेख आहे. त्यात प्रामुख्याने शिवाजीनगर व कोथरूड, प्रभात रस्ता, एरंडवणा या विकसनशील भागातील रस्त्यांची संख्या जास्त आहे. प्रशासनाने मंजुरीसाठी म्हणून स्थायी समितीसमोर ठेवतानाच अनेक नियमांना बगल दिली असल्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक विशाल तांबे यांचे म्हणणे आहे. हे ३२३ रस्ते कशाच्या आधारावर निवडले त्याचे निकष जाहीर करावेत अशी मागणीच त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे, काँग्रेसचे अरविंद शिंदे, मनसेचे वसंत मोरे यांनीही त्याला विरोध केला. त्याचीच दखल घेत पवार यांनी आयुक्तांना जाहीरपणे बहुमताच्या जोरावर विषय लादू नका अन्यथा सरकारला लक्ष घालावे लागेल अशा शब्दात खडसावले होते.तरीही स्थायी समितीत उपसूचना देत प्रस्ताव मंजूर झाला. त्यामुळे अजित पवार संतप्त झाले असून त्यांनी त्यासाठीच नगरविकास खात्यासोबत मुंबईत बैठक आयोजित केली आहे. या प्रस्तावाची गरज व आवश्यकता पटवून देण्याबाबत आयुक्तांना सांगण्यात आले आहे. आमदार पाटील यांना पुण्यात त्यांची स्वतंत्र जागा तयार करायची आहे. कोल्हापूरातून पुण्यात कोथरूडला येऊन आमदार झाले तरी त्यांचे पुण्यात स्वतंत्र अस्तित्व निर्माण व्हायला तयार नाही. ते करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना खो देण्याचा पुण्याच्या दादांचा प्रयत्न होताच. तो त्यांना या रस्ता रुंदीकरण प्रस्तावने मिळवून दिला असल्याची चर्चा आहे. नगरविकास खात्याने प्रस्ताव रद्द केला तर कोल्हापूरच्या दादांना पुण्याचे दादा भारी पडले असेच सिद्ध होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
रस्त्यांच्या रुंदीकरणावरुन ‘राजकारण’तापले; पुणे व कोल्हापूरचे दोन 'दादा' एकमेकांसमोर उभे ठाकले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 5:03 PM
पुणे महापालिकेतील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपाकडून बहुमताने मंजूर
ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांचे पुण्यात बस्तान बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न