पुणे - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पारदर्शकता राहिली नाही, असा गंभीर आरोप कुस्तीगीर संघटनेचे वरिष्ठ मार्गदर्शक काकासाहेब पवार यांनी केला आहे. स्पर्धेतील अंतिम लढतीत जाणीवपूर्वक हस्तक्षेप करण्यात आला आणि निकाल प्रभावित करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.
काकासाहेब पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की,“ही कुस्ती नियमानुसार थांबवली गेली नाही.रेफ्रीने मोठी चूक केली. त्या रेफ्रीवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे. तसेच, त्यांनी आयोजकांवर टीका करत म्हटले की, “संघटनांमध्ये फूट पडल्यामुळे स्पर्धांमध्ये गोंधळ उडतो आहे.नियोजनाचा अभाव आणि बाहेरून होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामुळे खऱ्या पैलवानांना अन्याय सहन करावा लागत आहे.”
न्यायाच्या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचा इशारापवार यांनी पुढे सांगितले की,जर महाराष्ट्रातील संघटना योग्य तो न्याय देऊ शकत नसेल, तर आम्ही थेट वर्ल्ड रेसलिंग असोसिएशनकडे न्याय मागू.“खेळाडूंचे करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे.एखादा पैलवान सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी जिंकू नये,यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही चुकीची मानसिकता आहे,” असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील कुस्ती संघटनांमध्ये दुहेरी धोरण?महाराष्ट्रातील कुस्ती संघटनांमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत, हेच या गोंधळाचे मूळ कारण असल्याचे पवार यांनी म्हटले. “आम्ही सर्वोच्च न्यायालयात आहोत, मग दुसऱ्या गटाला वेगळे नियम का लागू होत आहेत? हा दुटप्पीपणा थांबला पाहिजे,” असे ते म्हणाले.
खेळाडूंच्या भविष्याचा विचार करावा - पवारया वादामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. “आम्ही आमच्या खेळाडूंसाठी लढत राहू. जर योग्य न्याय मिळाला नाही, तर आम्ही स्पर्धेतून माघार घेऊ. आमच्या पैलवानांनी मेहनत केली आहे, त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.