पुणे : सूज आल्यासारखे वाढत्या पुण्याला चालवण्यासाठी महापालिका तितकी सक्षम असणे गरजेचे आहे. त्यातच आता नवी अकरा गावही समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे मोठी महापालिका यंत्रणा असणे ही कोणत्याही राजकीय पक्षाची इच्छा नव्हे तर काळाची गरज बनली होती. त्यानुसार गेली तीन वर्ष विस्तारीत इमारतीचे बांधकाम सुरु होते. आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदघाटन करत नवी इमारत वापरासाठी खुली झाली.मात्र या निमित्ताने शहरात पुन्हा एकदा राजकारण रंगलेले दिसले. त्यातले काही निवडक मुद्दे लोकमतच्या वाचकांसाठी
दोन आमंत्रणपत्रिका : महापालिकेने या कार्यक्रमासाठी एक नाही तर दोन आमंत्रणपत्रिका छापल्या आहेत. यातील एका आमंत्रणपत्रिकेत सर्व पक्षांच्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांची नावे टाकली होती तर दुसऱ्या आमंत्रणपत्रिकेत फक्त भाजप पदाधिकारी आणि नेत्यांची नावे होती. साहजिकच विरोधकांच्या हातात यामुळे आयते कोलीत मिळाले आणि वादाला सुरुवात झाली.
पवारांची दांडी : या इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रवादीची सत्ता असताना अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. अर्थात आता भाजपची सत्ता आल्यावर त्यांनाही कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते. मात्र भाजपसोबत व्यासपीठावर एकत्र येण्याचे त्यांनी टाळले.
अजित पवार आले पण...: एकेकाळी पुण्याचे कारभारी म्हणून ओळखले जाणारे अजित पवार इमारतीची पाहणी करून गेले पण सकाळी. कार्यक्रम दुपारी असताना पवार सकाळी साडेआठ वाजता अधिकाऱ्यांसह पाहणी करून गेले आणि आमचे महापालिकेवर लक्ष आहे असा संदेश देण्यातही यशस्वी झाले.
छत गळायला लागलं : तब्बल ४८ कोटी रुपये खर्च करून तयार केलेली इमारतीचे उदघाटन काम अपूर्ण असताना करण्यात आलं आहे. त्याचा अनुभव लगेचच आला असून उदघाटन सुरु असतानाच पावसामुळे पाणी गळायला लागलं आणि ४८ कोटी पाण्यात गेल्याची चर्चाही सुरु झाली. अर्थात चालू कार्यक्रमात हा प्रकार घडल्यामुळे पदाधिकाऱ्यांना उघड्या डोळ्यांनी ही मानहानी सहन करावी लागली.
काही नगरसेवक अटकेत काही पालिकेत :पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन केले जात असताना बाहेर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्वागत करण्यासाठी उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना काही काळ अटक करण्यात आली होती. नगरसेवक प्रकाश कदम, योगेश ससाणे, नंदा लोणकर, रत्नप्रभा जगताप यांच्यासह महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांना काहीकाळ पोलीस स्टेशनला नेले होते.