भाजपकडून दहशतीचे, आमिषाचे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 11:38 PM2019-04-04T23:38:14+5:302019-04-04T23:42:44+5:30
पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप : आश्वासनांचा हिशेब जनता विचारेल
पुणे : भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत दहशतीचे आणि आमिषाचे राजकारण केले जात आहे. साम, दाम, दंड, भेद यावर भाजपचे सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच ज्यांनी प्रसंगी तुरूंगवास सोसून भाजप पक्षाला सत्ता मिळवून दिली, त्यापैकी भाजपचा एकाही कार्यकर्ता किंवा संघाची विचारधारा असणाऱ्या व्यक्तीला भाजपने निवडणुकीसाठी उमेदवारी दिली नाही. अनेक उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांतून आयात केले आहेत. भाजपला याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहत आहेत, असेही चव्हाण यांनी नमूद केले.
कॉँग्रेस पक्षाचे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, आमदार विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रवीण गायकवाड, संगीता तिवारी आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, भाजपकडून व्यक्तिकेंद्रीत राजकारण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत मिळालेला प्रतिसाद पाहता मोदी लाट पूर्णपणे ओसरली आहे. मागील निवडणुकीत मोदींनी दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली, त्याचे आकलन लोकांनी केलेले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असे लोक भाजपला विचारत आहेत.
काँग्रेसने प्रकाशित केलेला जाहीरनामा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. या जाहीरनाम्यातील मुद्यांसह शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच राफेलमधील घोटाळा या मुद्द्यांवर काँग्रेसतर्फे प्रचार केला
जाणार आहे.
गोळीबाराचा मुद्दा केवळ आरोपापुरताच
च्मावळ येथील शेतकरी गोळीबाराषियी ते म्हणाले, या प्रकारच्या घटनांबाबतचे आदेश कधीही राजकीय स्तरावर दिले जात नाहीत. स्थानिक परिस्थिती पाहून तेथील प्रमुख पोलीस अधिकारी यावर निर्णय घेत असतात. परंतु, या घटनेची सर्व चौकशी व इतर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.त्यामुळे हा मुद्दा राजकीय आरोप करण्यापुरता उरला आहे.