पुणे : मागील लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरात पिछाडीवर पडलेल्या काँग्रेस पक्षाने यावेळी मात्र आघाडी घेतली आहे. काँग्रेस भवनमध्ये वर्षभरापुर्वीच सोशल मीडिया सेल सुरू करण्यात आला असून या निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. उमेदवाराचा प्रचार, सभांचे प्रक्षेपण, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या चुकांवर बोट ठेवणारे व्हिडिओ, संदेश प्रसारित करण्यास सुरूवात झाली आहे. दिवसागणिक ही सोशल मीडिया वॉर रंगत जाणार आहे. निवडणुक काळात उमेदवार प्रचार सभा, फेऱ्या, मतदारांच्या गाठीभेटींमध्ये व्यस्त असतात. पण सर्वच मतदारांपर्यंत पोहचणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला. त्याचा त्यांना खुप फायदाही झाला. त्यानंतर इतर पक्षांना सोशल मीडियाचे महत्व कळाले. त्यावेळी पुण्यात काँग्रेसने सोशल मीडियाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यानंतरच्या विधानसभा व महापालिका निवडणुकीत पक्ष फार सक्रीय नव्हता. याचे महत्व ओळखून वर्षभरापूर्वी काँग्रेस भवनमध्ये स्वतंत्र सोशल मीडिया वॉर रुम तयार करण्यात आली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोशल मीडिया सेल सक्रीय झाल्याचे सेलचे प्रमुख चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले. प्रामुख्याने फेसबुक आणि वॉट्स अॅपचा वापर अधिक प्रमाणावर केला जात आहे. व्हाट्स अॅपवर एकावेळी १५ ते २० हजार लोकांपर्यंत पोहचतो. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभांचे लाईव्ह प्रक्षेपण, विविध योजना, जाहीरनाम्यातील आश्वासनांचे व्हिडिओ, संदेश, उमेदवाराच्या सभा, पदयात्रा, गाठीभेटींचे लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. नरेंद्र मोदी यांनी यापुर्वी दिलेली आश्वासने आणि सद्यस्थिती याचेही व्हिडिओ तयार केले जात आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाणीप्रश्न, वाढती गुन्हेगारी, वाहतुक समस्या, स्मार्ट सिटीचा उडालेला फज्जा अशा अनेक मुद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून घेरण्यात येणार आहे. काँग्रेसने आतापर्यंत शहरात आणलेले प्रकल्प, त्यामुळे शहराचा झालेला विकासही या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोहचविला जाईल. त्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युबचाही वापर केला जात आहे. उमेदवार उशिरा जाहीर झाल्याने काही मयार्दा आल्या होत्या. पण आता पुर्ण ताकदीने मैदानात उतरलो असल्याचे पुरंदरे यांनी सांगितले.
सोशल मीडियावर रंगणार ‘ राजकीय वॉर’ काँग्रेस सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 9:01 PM
मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढला आहे...
ठळक मुद्देफेसबुक, व्हाट्स अॅपवरून उमेदवाराचा प्रचार