'मविआ' चा पुणे महापालिकेवर पोलखोल मोर्चा; नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे सहभागी होणार
By राजू हिंगे | Published: May 22, 2023 04:07 PM2023-05-22T16:07:47+5:302023-05-22T16:08:08+5:30
मोर्चामध्ये समान पाणीपुरवठा योजना आणि विविध कामांच्या निविदांमधील भ्रष्टाचाराची पोलखोल
पुणे: पुणे महापालिकेच्या कारभाराविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट या महाविकास आघाडीच्या वतीने 16 जून रोजी पोलखोल मोर्चा आयोजित केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे या मोर्चात सहभागी होणार आहे
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार मोहन जोशी, संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली .
लाल महाल येथून 16 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा महापालिकेवर जाणार आहे. या मोर्चामध्ये समान पाणीपुरवठा योजना आणि विविध कामांच्या निविदांमधील भ्रष्टाचाराची पोलखोल आहे. या मोर्चानंतर महापालिकेसमोरच होणाऱ्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते अजित पवार माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.