इंदापूर - पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १४ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी २६ सप्टेंबरला मतदान होत आहे. तर, गुरुवारी २७ रोजी मतमोजणी होणार आहे. बुधवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान केंद्रावर होणार असल्याची माहिती तालुका निवडणूक अधिकारी तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.तालुक्यातील १४ ग्रामपंचायती पैकी तरटगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची बिनविरोध निवड झाली असल्याने सध्या १३ गावांच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मतदान होणार आहे त्यामध्ये, वडापुरी, कालठण नं. १, कालठण नं.२, पवारवाडी, बोराटवाडी, खोरोची, उद्घट, पंधारवाडी कांदलगाव, अगोती नं.१, अगोती नं. २, शेळगांव व गोखळी या गावांमध्ये एकूण ४५ मतदान केंद्रे असून प्रत्येक गावात पाच कर्मचारी व एक पोलीस अधिकारी असे सहा शासकीय कर्मचारी निवडणूक प्रक्रिया कामकाजासाठी तयार आहेत.या मतदान केंद्रांवर एकूण २६ हजार ०९० मतदारापैकी, १३ हजार ७९३ पुरूष व १२ हजार २९७ महिला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १३ गावांमध्ये १३ सरपंच पदासाठी ४३ तर १३० सदस्य पदासाठी २७१ उमदेवार निवडणुक रिंगणात आहेत. संबंधित ग्रामपंचायती क्षेत्रातील ग्रामस्थांनी निवडणुक आयोगाने निर्धारीत केलेल्या ओळखपत्रासह आपला मतदानाच हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.प्रशासनाच्या वतीने निवडणुक कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले असून सर्व साहित्यासह मतदान केंद्रावर पाठविण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रीयेत प्रशिक्षण तसेच कर्मचारी निवड यासाठी नायब तहसीलदार संजीवन मुंडे, शुभांगी अंभगराव, व विशेष अधिकारी डी. के . राठोड यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे.
इंदापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचे आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:50 AM