पिंपरी : काळभोरनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेची प्रभाग क्रमांक २६ ह्यअ’(काळभोरनगर) ही जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसह भाजपा, शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराचा समारोप झाला. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. वीस केंद्रांवर होणार असून, प्रत्येक केंद्रावर चार अधिकारी, एक पोलीस आणि एक कर्मचारी नेमण्यात आले आहेत. अशा प्रकारे २० केंद्रांवर ८० अधिकारी, २० पोलीस आणि २० कर्मचारी असतील. निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. यासाठी दोन पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर एक मतदान यंत्र ठेवण्यात येणार आहे. या प्रभागात एकूण १८ हजार ३२६ मतदार असून, यामध्ये १० हजार १८१ पुरुष, तर ८ हजार १४५ महिलांचा समावेश आहे. मतदान यंत्रे आणि इतर साहित्य शनिवारी दुपारीच केंद्रांवर पोहोचविण्यात आले. प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रापासून दोनशे मीटर परिसरात मतदारांनाच प्रवेश देण्यात येईल. वाहनांना बंदी आहे. मतमोजणी सोमवारी सकाळी दहा वाजता निगडी, प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २६ येथील डॉ. हेडगेवार भवन येथे होऊन एक तासात निकाल स्पष्ट होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली. (प्रतिनिधी)
पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
By admin | Published: January 10, 2016 3:55 AM