लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या एक महिन्यापासून रणधुमाळी सुरू असलेल्या जिल्ह्यात ६४९ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी (दि. १५) मतदान होत आहे. यासाठी तब्बल ११ हजार ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.
कोरोनामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यात आमदार, स्थानिक नेत्यांच्या पुढाकारामुळे ९५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. आता ६४९ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर, मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती आदी गोष्टींची खबरदारी घेण्यात आली आहे. यामुळे गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेसात ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवारी (दि. १८) प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.
चौकट
शाई डाव्या हाताच्या अनामिकेला
जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले असून अनेक मतदारांच्या बोटाची शाई अद्याप गेलेली नाही. यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत डाव्या हाताच्या तर्जनी व मधल्या बोटाऐवजी अनामिकेला शाई लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
चौकट
निवडणुका होणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
खेड -८०, भोर-६३, शिरूर-६२, जुन्नर-५९, पुरंदर-५५, इंदापूर-५७, मावळ -४९, हवेली- ४५, बारामती- ४९, दौंड - ४९, मुळशी - ३६, वेल्हा - २०, आंबेगाव- २५, एकूण : ६४९
चौकट
- जिल्ह्यातील निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायती : ७४८
- बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती : ९५
- मतदान होत असलेल्या ग्रामपंचायती : ६४९
- एकूण प्रभाग संख्या : ५०५३
- एकूण उमेदवार : ११००७
- महिला उमेदवार : ५००७
- एकूण मतदान केंद्र : २४३९
- अधिकारी-कर्मचारी : १३४१७
चौकट
बंदोबस्ताला पाच हजारांपेक्षा जास्त पोलीस
ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गावकी-भावकीचे राजकारण तापलेले असते. अशा परिस्थितीत मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यात ५ हजारपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
चौकट
मतदान केंद्रावर आरोग्य पथक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याने जिल्हा प्रशासनाने अधिक खबरदारी घेतली आहे. सुरक्षित शारीरिक अंतर राखणे, सॅनिटायझरची उपलब्धता, मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानासाठी शेवटचा अर्धा तास राखीव ठेवला आहे.