शेलपिंपळगाव : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी आज (दि. २८) मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. अगदी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची मतदानासाठी उपस्थिती होती. खेडचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी सकाळी दहाच्या दरम्यान सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव, राजगुरुनगर, चाकण, वाडा, कनेरसर, पाईट आणि आंबोली या सात ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे.
शेलपिंपळगाव मतदान केंद्राबाहेर बहुतांश उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. विशेषतः खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीच्या रिंगणात उमेदवार असलेले तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते - पाटील स्वतः मतदारांच्या स्वागतासाठी उभे होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री भीमाशंकर सहकारी शेतकरी पॅनेल तर भाजप, शिंदे व ठाकरे सेना आणि इतर असे सर्वपक्षीय यांचा श्री भीमाशंकर सहकार शेतकरी परीवर्तन पॅनेल असा थेट सामना रंगत आहे. प्रचारात झालेल्या आरोप - प्रत्यारोपांमुळे बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
शेलपिंपळगाव केंद्रावर दुपारी दीडवाजेपर्यंत ग्रामपंचायत व सोसायटीचे ९९ टक्के मतदान पूर्ण झाले. येथील मतदान केंद्रावर परिसरातील १६ ग्रामपंचायतींचे एकूण १६९ तर १५ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे १८६ आहे. तर राजगुरुनगर येथील मतदान केंद्रावर सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी - आडते व हमाल मापाडी या गटातील मतदान घेण्यात येत आहे. सकाळच्या सत्रात बहुतांश केंद्रावर मतदारांनी हजेरी लावून मतदान केले. मतदान केंद्रावर निवडणुक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी पाहणी केली. दरम्यान राजगुरूनगर येथे शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी मतमोजणीला सुरुवात होईल. रात्री बारा वाजेपर्यंत विजयी उमेदवारांची नावे जाहीर होतील.