पुणे : कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहे तुंबलेली, एका हॉलमध्ये पत्र्यांचा आडोसा घालून तयार केलेल्या ४ खोल्यांचा मतदान केंद्र म्हणून होत असलेला वापर असे चित्र आहे चंदननगरमधील हंबीरराव मोझे विद्यालयाचे. अपंगांना जाण्यासाठी या केंद्रामध्ये रॅम्पही नाही. या केंद्रावर पुरुष आणि महिलांची स्वतंत्र रांग कशी करावी असा प्रश्न मतदान अधिकाऱ्यांना आहे. पहिल्या मजल्यावर ६ वर्ग असून याठिकाणी जाण्यासाठी अरुंद बोळ आहे. तळमजल्यावरील एका हॉलमध्ये ४ केंद्रे पत्र्याचा तात्पुरता आडोसा घालून तयार केली आहेत. मतदानाच्या दर तासाच्या नोंदी करण्यासाठी तेथे फळ्याचीही सुविधा नाही. या हॉलला कसलाही दरवाजा नाही. प्राथमिक शाळा असलेल्या या केंद्रामधील स्वच्छतागृहे घाण आणि तुंबलेली असल्याने या केंद्रामध्ये नियुक्त झालेल्या स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांचे हाल होणार आहेत. या केंद्रामध्ये असलेल्या वर्गांमध्ये खुर्च्यांवरून कर्मचाऱ्यांची बाचाबाची झाली. उमेदवार प्रतिनिधींसाठी या केंद्रामध्ये खुर्च्यांची व्यवस्था नाही. ही बाब वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांची सोय ते करतील, असे सांगण्यात आले.बंद खोल्या, दारे असलेले केंद्र निवडणूक कार्यालयाला मिळाले नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्याशी या असुविधेबाबत प्रश्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पत्र्यांच्या आडोशाला उभारले मतदान केंद्र
By admin | Published: February 21, 2017 3:27 AM