पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अनेक मतदारांनी मतपत्रिका मिळाली नसल्याचे अर्ज दिले असून, त्यांपैकी काही जणांच्या नावाने अगोदरच मतदान झाल्याचे दिसून येत आहे़ मसापच्या निवडणूक प्रक्रिया कडक करण्याचा प्रयत्न आम्ही या वेळी केला असून, कोणताही गैरप्रकार उघडकीस आल्यास त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अॅड़ प्रताप परदेशी आणि अॅड़ सुभाष किवडे यांनी सांगितले़गेल्या महिनाभरापासून मसापची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे़ १३ जिल्ह्यांत ११ हजार २७७ मतदार आहेत़ मतदारयादीत अनेकांची नावे दोनदा आली आहेत़ त्यांना दोन-दोन मतपत्रिका रवाना झाल्या आहेत़ त्यातील काही मतपत्रिकांद्वारे मतदानही करण्यात आले आहे़ त्याच वेळी जवळपास १२० हून अधिक जणांनी आपल्याला मतपत्रिका मिळाली नसल्याचे अर्ज केले आहे़ दुबार मतपत्रिकेसाठी अर्ज करण्याची मुदत ८ मार्चपर्यंत होती़ याबाबत निवडणूक अधिकारी अॅड़ प्रताप परदेशी यांनी सांगितले की, मतदान यादीत ज्यांची नावे दोनदा आली आहेत, त्यापैकी एक मतपत्रिका रद्द करण्यात येणार आहे़ ज्यांनी मतपत्रिका मिळाली नसल्याचे अर्ज केले आहेत, त्यांना टपालाने पाठविलेल्या व परत आलेल्या मतपत्रिका यांची छाननी करून दुबार मतपत्रिका शुक्रवारी सायंकाळपर्यंत देण्यात येणार आहे़ टपालाद्वारे मतपत्रिका मागविण्याची पद्धत या निवडणुकीत असल्याने त्यात यापूर्वी अनेक गोंधळ व आरोप-प्रत्यारोप होत आले आहेत़ त्याला आळा घालण्याचा प्रयत्न आम्ही यंदा केला असून, त्याला बऱ्याच प्रमाणात यश आले असल्याचे अॅड़ सुभाष किवडे यांनी सांगितले़ मतपत्रिका गठ्ठ्याने घेणाऱ्यांंकडून मतदारांचे नाव, त्यांचा क्रमांक तसेच ते घेऊन येणाऱ्यांचे नाव व संपर्क क्रमांक घेण्यात येत आहे़ त्यामुळे कोणी मतदारांच्या परस्पर मतपत्रिका आणून दिली, तर ती कोणी दिली ते समजणार असल्याचे परदेशी म्हणाले.(प्रतिनिधी)
मतपत्रिका मिळाली नसतानाही मतदान
By admin | Published: March 11, 2016 1:51 AM