पुणे : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यात पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यानुसार ५ जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. ४ ऑगस्ट रोजी मतदान, तर ५ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यामुळे पुढील महिना या ग्रामपंचायत हद्दीत रणधुमाळी गाजणार आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या, जून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी तहसीलदार ५ जुलै रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. त्यानंतर १२ ते १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २० जुलै रोजी अर्जांची छाननी, तर २२ जुलै रोजी अर्ज माघारी घेण्याची मुदत असेल. याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ४ ऑगस्ट रोजी मतदान, तर ५ ऑगस्टला मतमोजणी होईल. जिल्हाधिकारी ११ ऑगस्टला निवडणूक निकालाची अधिसूचना जारी करतील.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
हवेली – ५
शिरूर – ६
बारामती – २
इंदापूर – ४
पुरंदर - २