मंचर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात चुरशीने लढत होत आहे. त्यापुढे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान जास्त व्हावे यासाठी प्रयत्न केला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या १० जागांसाठी शांततेत मतदान पार पडले. राष्ट्रवादी व शिवसेना पक्षात चुरशीची लढत होत असून, भाजपा व कॉँग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केल्याने रंगत वाढली आहे. सकाळी मतदान यंत्राची पूजा कार्यकर्त्यांनी केल्यावर साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी उन्हाचा कडाका असूनही बऱ्यापैकी मतदान झाले. आज सुट्टी असल्याने रस्त्यावर तुरळक वाहतूक तसेच रहदारी होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनजागृती केली जात होती. त्याचा परिणाम जाणवला. प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या बरीच होती. स्वत:चा सेल्फी फोटो काढून तो सोशल मीडियावर अनेकांनी टाकला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अनेक गावांना भेटी दिल्या.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सकाळी लांडेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी पत्नी किरणताई व मुलगी पूर्वा यांच्यासह निरगुडसर येथे मतदान केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बहुतेक उमेदवारांनी सकाळच्या वेळी मतदान करून नंतर मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मंचर शहरात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी पहावयास मिळाली.
मंचरला शांततेत मतदान
By admin | Published: February 22, 2017 2:04 AM