पुणे : पुण्यातील 'या' मतदान केंद्राच्या गेटच्या आत मतदाराने प्रवेश जाताच त्यांना उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूने सावलीचा गारवा जाणवतो. पुढे जाताच पांढऱ्याशुभ्र पडद्याची सजावट डोळ्यात भरते. त्या पडद्यावर पोस्टर लक्ष वेधून घेतात ज्यावर सीओईपीचा इतिहास आणि इतर माहिती दिसते. तसेच पुण्याचा सांस्कृतिक इतिहासही वाचायला मिळतो. असे हे 'युनिक' मतदान केंद्र आहे शिवाजीनगर येथील सी ई ओ पी तंत्रज्ञान विद्यापीठ. पुण्यात हे मतदान केंद्र अनोखे ठरले असून मतदार राजाचे लक्ष वेधून घेत आहे.
मुळात तरूणामध्ये राजकरणाबाबत अनास्था आहे. ती अनास्था मग मतदान करण्यातही उमटते. खासकरून 18 ते 20 वयोगट यांचे मतदान कमी होते. तरुण मतदारांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती व्हावी, त्यांची रुची निर्माण व्हावी म्हणून पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) च्या युवा संसद क्लब च्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम निवडणूक आयोगाच्या संयुक्त विद्यमाने सुरू केला आहे, अशी माहिती या क्लबचे अध्यक्ष स्वप्नील क्षीरसागर यांनी दिली.
तसेच, येथे आलेल्या मतदारांना तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी तयार केलेले भिंत चढणारा रोबोट, विद्यापीठातील निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी ईव्हीएम मशीन, ऑल टेरेन व्हेइकल देखील ठेवले आहे.