पुणे : टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग ३०, ३३ व ३४ मध्ये दुपारपर्यंतच मतदानाचा उत्साह अधिक प्रमाणात दिसून आला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत या प्रभागांत अनुक्रमे ४४, ४९ आणि ४६ टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रांचा अपवाद वगळता बहुतेक केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तीनही प्रभागात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकूण ५८.२९ टक्के मतदान झाले. तीन प्रभागांमध्ये एकूण २३७ मतदान केंद्र, तर ६३२ मतदान यंत्रांद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली. तीन प्रभागात एकूण ६८ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ३४ मध्ये सर्वाधिक २४ उमेदवार असून, एकूण ८३ मतदान केंद्र आहेत. तर प्रभाग ३० मध्ये २३ उमेदवार आणि ७५ मतदान केंद्र तसेच प्रभाग ३३ मध्ये २१ उमेदवार आणि ७९ मतदान केंद्र होती. तीनही प्रभागात एकही मतदान केंद्र संवेदनशील नव्हते. तरीही पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवून दक्षता घेण्यात आली होती. जनता वसाहत-दत्तवाडी, वडगाव बु.-धायरी आणि सनसिटी-हिंगणे खु. या तीनही प्रभागांमध्ये सकाळी पहिल्या दोन तासांत फारशी गर्दी दिसून आली नाही. सरासरी १० टक्के मतदान बहुतेक केंद्रांवर झाले होते. त्यानंतर हळूहळू मतदार घराबाहेर पडू लागले. झोपडपट्टी तसेच सोसायटी भागातील काही मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.तीनही प्रभागात साडे तीन वाजेपर्यंत सरासरी ४७ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांची गर्दी ओसरू लागल्याचे चित्र दिसून आले. पुढील दोन तासांतही सुमारे १० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तीनही प्रभागात मिळून साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ५८ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)यादीत घोळ : मतदानापासून वंचिततीनही प्रभागांमध्ये काही मतदारांना यादीतील घोळामुळे मतदान करता आले नाही. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदानापूर्वीच अनेक मतदारांपर्यंत स्लिपा पोहचविल्या होत्या. त्यामुळे त्यांना फारसा त्रास झाला नाही. मात्र, जे मतदार थेट मतदान केंद्रांवर येत होते, त्यांना मतदान क्रमांक शोधण्यास त्रास होत होता. काहींचे मतदान यादीत नावच नसल्याने नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या यादीत काहींचे नाव, फोटो चुकीचे होते. पत्ता तसेच मतदान केंद्रही सापडत नव्हते. याबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही असमर्थता व्यक्त केली. पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून स्लिपा पोहचविल्या नसत्या, तर मोठा गोंधळ झाला असता, असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच सांगितले.वडगाव बु. भागात वादवडगाव बु. मधील मनपा शाळा परिसरात मतदान केंद्र अधिक संवेदनशील असल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एका मतदाराने बोगस मतदान केल्याच्या संशयावरून शिवछत्रपती बालक मंदिर या केंद्रासमोर दोन विरोधी गटांमध्ये वाद झाला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने तणाव निवळला.नीरजाचा ‘विशेष’ उत्साहलहानपणीच अपंगत्व आलेल्या नीरजा बागाईतकर या तरुणीनेही मतदानाचा हक्क बजावला. सिंहगड रस्त्यावरील विवेकानंद विद्या मंदिर शाळेत तिने मतदान केले. सध्या ती २७ वर्षांची असून, इग्नोमधून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. लहानपणीच अपंगत्व येऊनही न डगमगता तिने राज्यशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यामुळे तिला राजकारणाचे आकर्षण आहे. आतापर्यंत तिने प्रत्येक निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य पार पाडले आहे. तिचे आई-वडील तिला मतदान केंद्रावर घेऊन आले होते. नीट चालता येत नसतानाही केवळ आपले कर्तव्य बजावण्याच्या उद्देशाने तिने मतदान केले. याबाबत तिने आनंदही व्यक्त केला.ज्येष्ठ नागरिकांना त्रास काही मतदान केंद्रांवर पहिल्या मजल्यावर मतदान केंदे्र ठेवण्यात आली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व अपंग मतदारांना काही प्रमाणात त्रास झाला. इतरांची मदत घेऊन त्यांना मतदान केंद्रांत जावे लागत होते. मतदान केंद्राबाहेर बसण्यासाठीही पुरेशी व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना रांगेतच उभे राहावे लागत होते. काही केंद्रांवर त्यांना रांगेत पुढे घेत मतदानाची संधी दिल्याचेही पाहायला मिळाले.ज्येष्ठांसह महिलांची उपस्थिती लक्षणीयप्रभाग ३० मध्ये एकूण ६१ हजार १६५ मतदारांपैकी ३३ टक्के मतदारांनी दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ज्येष्ठांसह महिलाही लक्षणीय होत्या. तर प्रभाग ३३ मध्ये ५९ हजार २८७ पैकी ४० टक्के आणि प्रभाग ३४ मध्ये ६२ हजार ३७७ पैकी ३७ टक्के मतदारांनी दीड वाजेपर्यंत मतदान केले. वडगाव बु., जनता वसाहत या भागात दुपारी दीड वाजेपर्यंत काही केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून अधिकाधिक मतदारांना लवकरात लवकर मतदान केंद्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यामुळे दुपारपर्यंतच जास्त मतदान झाले. पुढील दोन तासांत प्रत्येक प्रभागात मतदानाच्या टक्केवारीत सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली.
मतदान केंद्रांवर दुपारपर्यंतच गर्दी
By admin | Published: February 22, 2017 3:26 AM