पुणे: विधानसभेच्या कसबा व चिंचवड या दोन मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात, तर चिंचवडमध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे व बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. परंतु दोन्हीकडे मतदान अत्यंत संथगतीने चालल्याचे निदर्शनास आले होते. दुपारी १ पर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान झाले होते. मात्र आता दुपारी १ ते ३ यावेळेत १२.५ टक्के मतदान होऊन एकूण मतदान ३०.५ टक्के झाले. अशातच कसबा मतदार संघातील महात्मा फुले पेठेत सायंकाळी ५ नंतरही मतदानासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
महात्मा फुले पेठेतील आचार्य विनोबा भावे शाळा केंद्रावर या महात्मा फुले पेठ येथे प्रचंड गर्दी झाली होती. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ असूनही नागरिक ५ नंतर मतदानाला येऊ लागले आहेत. या केंद्रावर मोठमोठ्या रांगा दिसून आल्या आहेत. आज रविवार सुट्टीचा दिवस असूनही नागरिक मतदानासाठी उशिरा आल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. उशिरा मतदानासाठी का आले असे नागरिकांना विचारले असता, उन्हाच्या तडाख्याने उशिरा बाहेर पडत असल्याचे कारण नागरिकांनी दिले आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीमध्ये मतदानासाठी नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याचे दिसून आले होते. आता दुपारी ३ पर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत कसब्यात अवघे एकूण मतदान ३०.५ टक्के झाले आहे. त्यामुळे जास्तीजास्त मतदारांना मतदानासाठी आणण्याचे आव्हान अजूनही राजकीय पक्ष आणि प्रशासनासमोर होते. मात्र पाच नंतरही मतदानासाठी नागरिकांच्या रांगा वाढू लागल्याने मतदानाची वेळ वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
२ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसब्यातील मतमोजणी कोरेगाव मार्क येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. चिंचवडमधील मतमोजणी कामगार भवन, थेरगाव इथे होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे निकालाबाबत पुणे जिल्ह्यालाच नाही, तर राज्यालाही उत्सुकता आहे.