- श्रीकिशन काळे
पुणे : मुळा-मुठा नदीपात्र एवढे प्रदूषित झाले आहे, की त्यातील जवळपास ६१ माशांच्या प्रजातीच नष्ट झाल्या आहेत. आता केवळ एक-दोन मासे सापडत असावेत किंवा तेदेखील नष्ट झाले असतील. आता या नद्या पुन्हा पूर्वीसारख्या स्वच्छ आणि प्रवाही करायच्या असतील, तर पुणेकरांनीच प्रयत्न केले पाहिजे, असे प्राणीशास्त्राचे अभ्यासक व संशोधक प्रा. हेमंत घाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काही वर्षांपूर्वी या नदीतील मासे बाटलीत जतन करून ठेवले आहेत. तेच आता पुणेकरांना पाहावे लागतील, असेही ते म्हणाले.
येत्या २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान शहरात नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या सुमारे २० संस्था एकत्र येऊन नदीसंवर्धनाचे काम करीत आहेत. प्रा. घाटेम्हणाले, ‘‘नद्यांच्या प्रदूषणाचा नाश हा केवळ पर्यावरणासाठी नव्हे, तर मानवासाठीदेखील घातक आहे. नद्या बिघडल्यामुळे मानवी आरोग्य, शेतकºयांचे अर्थकारण, अनेकांच्या रोजीरोटीवर परिणाम झालेला आहे. १९४२ मध्ये मुळा-मुठा नदीतमाशांच्या तब्बल ६१ प्रजाती अस्तित्वात होत्या. त्या साºयांच्या नोंदी केल्या होत्या. त्यानंतर आम्ही १९९२ ते १९९५ दरम्यान माशांचे सर्वेक्षण केले. तेव्हा अर्ध्याहून अधिक प्रजाती संपूर्णपणे नामशेष झाल्याचे उघड झाले. आता तर एकही मासा जिवंत राहू शकेल, अशी स्थितीमुठेची नाही.’’
मुळा-मुठेत सांडपाणी मोठ्या प्रमाणावर सोडले जात आहे. त्यातून फॉस्फेट व नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याने जलपर्णीचे प्रमाण वाढते. कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारे डिटर्जंट आणि साबण यामधील फॉस्फेट थेट नदीत येत आहे. परिणामी मासे नष्ट झाले आणि जलपर्णीसारखी वनस्पती वाढू लागली. जलपर्णीमुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता खालावते. त्यातील आॅक्सिजन कमी होते.त्यामुळे मासे व इतर जलचरांचा जीव जातो. आता तर मुठेतील पाण्यात हातदेखील घालावा वाटत नाही. अत्यंत घाण वास येतो.’’माशांचे संशोधनच दिले सोडून...मी मुठेतील अनेक मासे जतन करून ठेवले आहेत. ते इतर कोणाकडेही सापडणार नाहीत. पण आता मी माशांवरील संशोधनच सोडून दिले आहे. कारण मुठेमध्ये माशांचे अस्तित्वच नाही. पुणेकरांना वाटतच नाही की, मुठेसाठी आपण काही तरी करावे. त्यात महापालिकेतील अधिकारी आणि राजकीय नेते यांच्याकडेही इच्छाशक्ती राहिलेली नाही. त्यामुळे मी आता मुठेबाबत संशोधन करीत नाही. तिला पुनर्जीवित करायचे असेल, तर पुणेकरांनी रस्त्यावर येऊन मोठा दबाव आणला पाहिजे.सांडपाणी सोडणाºयांवर कडक कारवाई व्हावीजोपर्यंत नदीपात्रात सांडपाणी सोडणे बंद होणार नाही, तोपर्यंत नदी स्वच्छ होण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही. तसेच महापालिकेतर्फे ठिकठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण केंद्र सुरू व्हायला हवीत. जे सांडपाणी सोडतील, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी डॉ. घाटे यांनी केली. तसेच प्रदूषण महामंडळाने सातत्याने नदी प्रदूषणावर लक्ष दिले पाहिजे, नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून नदीत कचरा टाकू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.संशोधनाकडे दुर्लक्षचमी मुठा नदीचे संशोधन करीत असताना अनेक मासे बाटलीत जतन करून ठेवले आहेत. आता हे मासे नदीतून नष्ट झाले आहेत. त्यामुळे केवळ बाटलीतच ते पाहायला मिळणार आहेत. खरं तर इंग्लंडप्रमाणे आपण संशोधनावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी दोनशे वर्षांच्याही वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. तसेच ते संशोधनावर लक्ष देतात, आपल्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते, अशी खंत प्रा. घाटे यांनी व्यक्त केली.